मुंबई केंद्रासंबंधी

कृष्णमूर्तींचं मुंबई शहराशी असलेलं अतूट नातं लक्षात घेऊन १९८७ साली कृष्णमूर्ती फाउडेंशनच्या मुंबई कार्यकारिणीची हिंमत निवास, मलबार हिल येथे स्थापना करण्यात आली. कृष्णमूर्ती आपल्या मुंबईमधील वास्तव्यात हिंमत निवासमध्ये लोकांशी संवाद साधत असत.

मुंबई केंद्राचे उपक्रम आणि कार्यक्रम

मुंबई केंद्रामध्ये कृष्णमूर्तींची भाषणं, लेखन, संवाद-चर्चा पुस्तकरुपात, तसंच ऑडिओ आणि डिव्हिडीजच्या माध्यमांमधून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इथल्या छोट्या वाचनालयात बसून वाचन करण्याची आणि व्हिडिओ पाहण्याचीही सुविधा आहे.

कार्यालयाच्या जागेतच दर शनिवार-रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता, कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांच्या आणि संवाद-चर्चांच्या डिव्हिडीज दाखवल्या जातात. तसंच इथे दर महिन्याच्या तिसर्‍या गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता गटचर्चा आयोजित केली जाते. दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी रिट्रीट हाउस, (माउंट मेरी चर्चजवळ) वांद्रे येथे व्हिडिओ आणि गटचर्चेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

कृष्णमूर्तींच्या शिकवणुकीचा सखोल अभ्यास करणार्‍या वक्त्यांना वेळोवेळो आमंत्रित करून शहरात सार्वजनिक स्तरावर भाषणांचं आणि विविध विषयांवरील परिसंवादंचं आयोजन करण्यात येतं. शाळा, आणि महाविद्यालयांमधील शिक्षक आणि युवा विद्यार्थी अशा विशिष्ट गटांसाठीही काही कार्यक्रम आयोजित केले जातात. कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांचे व्हिडिओ दाखविण्यात येतात, कृष्णमूर्तींच्या साहित्याचं वाचन आणि संवाद-सत्रं आयोजित करण्यात येतात. शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींसाठी कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित परिसंवादांचं आयोजन करण्यात येतं. 
फाउंडेशनच्या चेन्नई येथील मुख्यालयाच्या एका विशेष योजनेअंतर्गत फाउंडेशनने प्रकाशित केलेली काही पुस्तकं आणि ध्वनिचित्रफिती (व्हिडिओ) वाचनालयांच्या विनंतीनुसार त्यांना विनामूल्य दिली जातात. याशिवाय वाचनालयं, शाळा आणि महाविद्यालयं ह्यासारख्या संस्थांना पुस्तकं, ऑडिओ सीडीज, डिव्हिडीज यासारखं साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलं जातं. स्थानिक पुस्तक प्रदर्शनातही मुंबई केंद्राचा सहभाग असतो.

कृष्णजींची शिकवण अधिकाधिक मराठी आणि गुजराथी भाषिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, केंद्रातर्फे अंतरलहरी’ (मराठी) आणि ‘अंतरमेळ’ (गुजराथी) या वृत्तपत्रिका दर चार महिन्यांनी वितरित केल्या जातात. कृष्णमूर्तींच्या निवडक पुस्तकांची मराठी आणि गुजराथीमध्ये भाषांतरं, तसंच त्यांच्या व्याख्यानांच्या/संवाद-चर्चांच्या ध्वनिचित्रफितींची मराठी आणि गुजराथी उपशिर्षकं तयार करण्याचं काम केंद्रातर्फे करण्यात येतं. अधं विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराथी भाषांमधील काही निवडक पुस्तकांची ब्रेल लिपीमधील आणि ध्वनिमुद्रित (ऑडिओ पुस्तकं) संस्करणंदेखील उपलब्ध करण्यात आली आहेत.