शिक्षण केंद्रं

योग्य शिक्षण घडून येण्यासाठी आपल्याला खचितच, समग्र जीवनाचा अर्थ समजला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला सातत्याने नव्हे, तर खर्‍या अर्थाने व थेटपणे विचार करता आला पाहिजे. सातत्याने विचार करणारा माणूस हा अविचारी असतो, कारण तो एका नमुन्याचं अनुसरण करत असतो, तो त्याच त्याच वाक्यांची पुनरुक्ती करत असतो, एका ठराविक साच्यातच विचार करत असतो. तार्किक मिमांसा करून किंवा अमूर्त कल्पनांनी आपण अस्तित्वाला समजून घेऊ शकत नाही. जीवनाचं आकलन म्हणजेच आत्मबोध असतो, आणि तीच शिक्षणाची सुरुवात आणि तेच शिक्षणाचं उद्दिष्ट असतं.
जे. कृष्णमूर्ती,  शिक्षण आणि जीवन रहस्य
शिक्षण हा कृष्णमूर्तींसाठी कायमच अतिशय आस्थेचा विषय होता. त्यांना वाटत असे की आपला वंश, राष्ट्रीयत्व, धर्म, आपली परंपरा आणि आपली मतं ह्या सर्व गोष्टींबद्दलची आपली संस्कारबद्धता - जी अटळपणे संघर्षाला कारणीभूत होते - तिच्याबद्दल जर लहानथोरांना जाण आली, तर त्यांच्या जीवनाला ते एक वेगळंच स्वरूप आणू शकतील. 

कृष्णमूर्तींच्या ह्या आस्थेमधून आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या आमूलाग्र परिवर्तनासाठी नवी संस्कृती व नवा माणूस घडविण्यासाठी त्यांनी शिक्षण केंद्रं स्थापन केली - मुलांसाठी शाळा आणि प्रौढांसाठी अध्ययन व चिंतन केंद्रं. आंध्रप्रदेशातील ऋषी व्हॅली शिक्षण केंद्र, वाराणसी येथील राजघाट शिक्षण केंद्र, चेन्नईमधील द स्कूल, चेन्नईजवळचं पालार शिक्षण केंद्र (पाठशाला), बंगलोर शिक्षण केंद्र आणि पुण्याजवळील सह्याद्री शिक्षण केंद्र; भारताबाहेर ब्रॉकवुड पार्क, इंग्लंड येथे ब्रॉकवुड पार्क स्कूल आणि अमेरिकेत ओहाय येथे ओक ग्रोव्ह स्कूल ही शिक्षण केंद्रं स्थापण्यात आली. 

कृष्णमूर्ती जेव्हा मुलांशी बोलत तेव्हा त्यांची भाषा साधी आणि सुस्पष्ट होत असे. ते मुलांबरोबर अनेक गोष्टींचा शोध घेत - त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं, एकमेकांशी असलेलं नातं, भीती, अधिकारवृत्ती, स्पर्धा, प्रेम आणि स्वातंत्र्य अशा गोष्टींबद्दल असलेल्या मानसिक प्रश्नांशी असलेलं नातं. शिक्षकांशी संवाद साधत त्यांनी शाळा ह्या शब्दाची एक वेगळीच व्युत्पत्ती मांडली: शाळा म्हणजे अशी जागा जिथे मोकळा वेळ असतो, विषयांच्या अभ्यासाबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही आपल्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी फुरसत असते; शाळा म्हणजे एक असं सामाजिक वातावरण जिथे स्वातंत्र्य आणि जबाबदारी ह्या दोन्हींसह जीवनाचा व्यापक स्तरावर शोध घेता येतो. 

वैश्विक दृष्टीकोन, शोधक मनोवृत्ती आणि मानव व पर्यावरणाविषयीची आस्था ह्या गोष्टींची जोपासना करणं हे कृष्णमूर्ती शिक्षण केंद्रांच्या उद्दिष्टांमध्ये अभिप्रेत आहे.
शिक्षणाने आपल्याला चिरंतन मूल्यांचा शोध घेण्यासाठी साहाय्य केलं पाहिजे. म्हणजे आपण केवळ सूत्रांना चिकटून राहणार नाही किंवा घोषणांचा पुनरूच्चार करत राहणार नाही. राष्ट्रीय आणि सामाजिक स्तरावरील आपल्या पूर्वग्रहांना महत्व न देता उलट त्यांचा बिमोड करण्यासाठी शिक्षणाने आपल्याला मदत केली पाहिजे, कारण हे पूर्वग्रहच माणसांमधील तेढ वाढवतात. दुर्दैवाने सध्याची शिक्षणव्यवस्था आपल्याला दुसर्‍यांच्या तंत्राने चालण्यासाठी, यांत्रिकपणे आणि विचारशून्यपणे पुढे सरकण्यासाठी भाग पाडत आहे. अशा शिक्षणाने जरी माहितीत भर पडत असली तरी त्यामुळे आंतरिक स्तरावर आपलं अधुरेपण कायम राहिलं आहे आणि आपल्याच हाताने आपलं जीवन आपण बिघडवलं आहे आणि आपली सृजनशीलता हरवली आहे.
जीवनाच्या समग्र आकलनाशिवाय आपले वैयक्तिक आणि सामुहिक प्रश्न अधिक गहन होतात आणि वाढतच जातात. केवळ विद्वानांची, कुशल कारागिरांची आणि नोकर्‍या शोधणार्‍यांची निर्मिती करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट नसून निर्भय आणि एकात्म स्त्री-पुरुषांना घडवणं हे उद्दिष्ट आहे; कारण अशा व्यक्तींमध्येच चिरस्थायी शांती असू शकते.
 
जे. कृष्णमूर्ती,   शिक्षण आणि जीवन रहस्य