कृष्णमूर्ती फाउंडेशन्स – एक दृष्टिक्षेप

कृष्णमूर्तींच्या कार्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कृष्णमूर्ती फाउंडेशन या नावाने अमेरिका, इंग्लंड व भारत या तीन प्रमुख देशात, (आणि नंतर लॅटीन अमेरिकेतही) एकमेकांपासून स्वतंत्र पण प्रत्यक्षात एकमेकांच्या सहकार्याने काम करणारे न्यास स्थापन करण्यात आले. कृष्णमूर्तींच्या पुस्तकांचं प्रकाशन आणि त्यांनी स्थापन केलेल्या शाळांचं व अध्ययन केंद्रांचं व्यवस्थापन फाउंडेशनमार्फत होतं. कृष्णमूर्तींच्या शिकवणुकीचं जतन करून भावी पीढीसाठी तिचं विविध माध्यमांमधून प्रकाशनही केलं जातं.

एक संस्थापक ह्या नात्याने कृष्णमूर्तींनी ह्या सर्व फाउंडेशन्सचे उद्देश, त्यांच्यावरील जबाबदारी आणि त्यांचं पूर्णपणे असांप्रदायिक स्वरूप ह्या गोष्टी स्पष्टपणे, असंदिग्धपणे नमूद केल्या.  'शिकवणुकीच्या बाबतीत फाउंडेशन्सना कुठल्याही प्रकारचा (तज्ञतेचा) अधिकार नाही. त्या शिकवणुकीतच सत्य साठलेलं आहे. शिकवणुक समग्रपणे, अबाधितपणे आणि विकृत न होता जतन करण्याची फाउंडेशनची जबाबदारी आहे. शिकवणुकीसाठी कोणीही भाष्यकार किंवा प्रचारक नेमण्याचा फाउंडेशन्सना अधिकार नाही.’ 

कृष्णमूर्ती, डॉ. ॲनी बेझंट आणि इतर पाच संस्थापक सदस्यांनी ’ऋषी व्हॅली ट्रस्ट’ ह्या नावाने प्रथम एक धर्मादाय संस्था म्हणून स्थापली. १९५३ साली ह्या संस्थेचं नाव बदलून ’फाउंडेशन फ़ॉर न्यु एज्युकेशन’ करण्यात आलं आणि नंतर १९७० साली ’कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिय’ (KFI) असं तिचं नामकरण झालं. वसंत विहार, चेन्नईमध्ये ह्या संस्थेचं मुख्यालय आहे.

शिक्षण, संशोधन, तसंच सांस्कृतिक, मानवतावादी आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये ही संस्था कार्यरत आहे. कृष्णमूर्तींच्या जीवनदृष्टीच्या, शिकवणुकीच्या अनुषंगाने हे कार्य होत असतं. फाउंडेशनचं दुसरं मुख्य उद्दिष्ट म्हणजे कृष्णमूर्तींचं लेखन, त्यांची भाषणं, त्यांच्या जीवनाशी संबंधित माहिती, साहित्य मिळवणं, त्याचं जतन करणं आणि प्रकाशन करणं.

वसंत विहार- म्हणजे फाउंडेशनचं मुख्यालय जिथे आहे, तिथे कृष्णमूर्ती येऊन राहत असत आणि तिथेच त्यांची जाहीर व्याख्यानं आणि इतरांशी संवादही आयोजित करण्यात येत असत. आता ह्या मुख्यालयाच्या प्रांगणात अध्ययन केंद्र, जतनीकरण विभाग, प्रकाशन विभाग, दृकश्राव्य विभाग, ग्रंथविक्री विभाग आणि एक अतिथीसदन ह्यांचा समावेश आहे. 
राजघाट(वाराणसी), ऋषी व्हॅली, बंगलोर, उत्तरकाशी, सह्याद्री, कोलकाता, मुंबई आणि कटक येथे अध्ययन केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. ह्यातील बरीच केंद्रं अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी वसवण्यात आली आहेत आणि तेथील शांततामय वातावरण आत्मचिंतन करण्यास आणि कृष्णमूर्तींच्या जीवनदृष्टीचं गहन अध्ययन करण्यास पूरक आहे. ही केंद्रं तेथील इतर स्थानिक शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने व्हिडिओ कार्यक्रम आणि चर्चासत्रांचं आयोजन करत असतात.

कृष्णमूर्तींच्या दृष्टीने शाळा म्हणजे एक असं सामाजिक वातावरण असतं जिथे स्वातंत्र्य आणि जबाबदारी ह्या दोन्हींसह जीवनाचा व्यापक स्तरावर शोध घेता येतो. भारतात राजघाट(वाराणसी), ऋषी व्हॅली, बंगलोर, चेन्नई, चेन्नईजवळचं वळ्ळीपुरम आणि सह्याद्री येथे फाउंडेशनने शाळा स्थापन केल्या आहेत. कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक दृष्टीनुसार ह्या शाळांमधून जीवनासाठीचं समग्र शिक्षण दिलं जाण्याचा प्रयत्न असतो. ह्या शाळा म्हणजे आजूबाजूच्या भागातील समाजबांधवांसाठी देखील शिक्षण केंद्रं बनली आहेत आणि तिथे समाजोपयोगी प्रकल्प राबवले जातात.

कृष्ण्मूर्तींच्या निधनानंतर चेन्नई येथील जतनीकरण विभागामधून कृष्णमूर्तींच्या शिकवणुकीचं पुढच्या पिढीसाठी जतन करण्याच्या उद्देशाने प्रकल्प राबवण्यात येत आहे.

दर वर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला फाउंडेशनच्या एका केंद्रामध्ये वार्षिक संमेलन आयोजित करण्यात येतं. हे संमेलन सर्वांसाठी खुलं असतं. संमेलनाच्या मुख्य विषयावरील भाषणं, गटचर्चा आणि कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांचे व्हिडिओ स्क्रीनींग असं ह्या संमेलनाचं स्वरूप असतं. KFI च्या संकेतस्थळावरून, तसंच बुलेटिन, वृत्तपत्रिका आणि इमेल ह्या माध्यमांमधून ह्याबद्दल माहिती प्रसारित करण्यात येते.

अमेरिका आणि इंग्लंड येथील फाउंडेशन्सतर्फे तिथे शाळा तसंच अध्ययन केंद्र चालवली जातात. तिथे जतनीकरण विभागही स्थापन करण्यात आले आहेत.