जे. कृष्णमूर्ती – एक परिचय

मानसिक स्तरावर माणूस म्हणजे समग्र मानवता आहे. तो केवळ तिचं प्रतिनिधित्व करत नाही, तर तो म्हणजेच संपूर्ण मनुष्यजात आहे. मूलत: तो म्हणजे मानवतेची  संपूर्ण मानसिकता आहे. ह्या सत्यावर वेगवेगळ्या संस्कृतींनीं प्रत्येक माणूस वेगळा असल्याचा भ्रम लादला आहे. शेकडो वर्षं माणूस ह्या भ्रमात अडकला आहे आणि आता हा भ्रम राहिला नाही तर तेच वास्तव बनलं आहे. जर तुम्ही तुमच्या संपूर्ण मानसिक घडणीचं बारीक निरीक्षण केलंत तर तुम्हाला आढळून येईल की जसं तुम्ही दु:ख भोगता तसंच वेगवेगळ्या प्रमाणात अखिल मानवजात दु:ख भोगते. तुम्ही एकटे पडला असाल तर सर्व मानवजातीला हा एकटेपणा माहित असतो. वेदना, द्वेष, मत्सर, भीती सर्वांना माहित आहे. म्हणून मानसिकदृष्टया, आतून तुम्ही दुसर्‍या माणसासारखे आहात. शारीरिक, जैविक वेगळेपणा असेल, जसं उंच, ठेंगणा वगैरे - परंतु मूलत: तुम्ही सार्‍या मनुष्यजातीचे प्रतिनिधी आहात. म्हणून मानसिकरीत्या तुम्ही म्हणजे जग आहात. तुम्ही संपूर्ण मानवजातीला जबाबदार आहात, एक वेगळा माणूस म्हणून स्वत:लाच जबाबदार नव्हे; तो एक मानसिक भ्रम आहे... संपूर्ण मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून तुमचा प्रतिसाद संपूर्ण आहे, अंशत: नाही. मग जबाबदारीला एक पूर्णपणे वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तुम्हाला ह्या जबाबदारीची कला शिकली पाहिजे. जर कोणी मानसिकरीत्या आपण म्हणजे जग आहे, ह्या सत्याचं मर्म आत्मसात करू शकलं तर त्या जबाबदारीतूनच शक्तिशाली प्रेम निर्माण होऊ शकतं.
जे. कृष्णमूर्ती
  • ह्या युगातील एक थोर विचारवंत आणि आध्यात्मिक द्रष्टा म्हणून जे. कृष्णमूर्ती (१८९५ -१९८६) ह्यांची जगभर ख्याती आहे. सर्व मानव समाजाविषयी त्यांना प्रगाढ आस्था होती. लोकांना स्वत:वरच्या संस्कारबंधनांची आणि बंधमुक्त होण्याच्या शक्यतेचीही जाणीव करून देण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन अर्पित केलं.
  • वयाच्या ९० व्या वर्षापर्यंत कृष्णमूर्तीनी अथकपणे जगभरातील अनेक लोकांशी निरनिराळ्या प्रकारे संवाद साधला. कुठल्याही अधिकारवृत्तीने नव्हे, तर एक मित्र, एक सत्यप्रेमी ह्या नात्याने ते आपलं जीवनकार्य करत राहिले. ‘सत्याप्रत जाण्यासाठी कुठल्याही संघटित धर्माची, पंथाची किंवा संप्रदायाची जरुरी नाही. सत्य ही पथहीन भूमी आहे’, हे आपल्या भाषणांमधून, परिसंवादांमधून, तसंच अनेक विचारवंत, शिक्षक, विद्यार्थी, शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि धर्मज्ञांबरोबर झालेल्या चर्चांमधून त्यांनी विविध प्रकारे विशद केलं. 
  • आपल्या दैनंदिन जीवनात आपणा सर्वांना अनुभवास येणार्‍या गोष्टींबद्दल ते बोलत असत. आधुनिक समाजात जगताना भेडसावणार्‍या समस्या, त्यातील हिंसा व भ्रष्टता; सुरक्षितता व सुखाच्या शोधार्थ चाललेली व्यक्तीची धडपड; भीती, क्रोध, क्लेश व दु:खासारख्या आंतरिक दडपणापासून मानवाने मुक्त होण्याची गरज ही त्यापैकी काही विषयसूत्रं म्हणता येतील. ते अत्यंत नेमकेपणाने मानवी मनातील तरल गुंतागुंतीचा वेध घेत आणि नित्य जीवनात एक प्रकारची चिंतनशीलता असणं किती आवश्यक आहे ह्याकडे लक्ष वेधत.
  • सत्य हा ’प्रदेश साकल्याचा’ आहे याचं भान अधिकाधिक लोकांना यावं म्हणून त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांना अनेक देशात ‘स्वयं-अध्ययनकेंद्रां’ची उभारणी करण्यासाठी प्रेरणा दिली. आत्मशोधासाठी अतिशय पूरक असं वातावरण लाभलेल्या या अध्ययन केंद्रांमध्ये कृष्णमूर्तींची पुस्तकं, त्यांच्या भाषणांच्या ध्वनि-चित्रफिती, सीडीज, डिव्हिडीज इत्यादी साहित्यही उपलब्ध करून दिलं जातं.
  • अगदी कोवळ्या वयापासूनच मुलांनाही जीवनाच्या-सत्याच्या साकल्याची जाणीव होत राहिली तर त्यांच्या मनाच्या कक्षा रुंदावतील हे जाणून, ठिकठिकाणी निसर्ग-संपन्न वातावरणात निवासी शाळा उभारण्यासाठी कृष्णमूर्तींनी प्रोत्साहन दिलं. या शाळांचे अभ्यासक्रम आणि इतर उपक्रम यांचं आयोजन करताना मुलं आणि शिक्षक, दोघांच्याही शोधक वृत्तीला वाव मिळेल याची काळजी घेतली जाते.
  • कृष्णमूर्तींची असंख्य भाषणं, मुलाखती, पुस्तकं, असं मौलिक विचारधन आपल्यासाठी उपलब्ध आहे. यापैकी काही महत्वपूर्ण साहित्याची जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरं करण्यात आली आहेत.