अध्ययन आणि चिंतन केंद्रं

ही जागा म्हणजे शिकणं, साधेपणाने जगणं, आंतरिक शिस्तीचं पालन करून काम करणं - कोणत्याही गुरुविना, कोणत्याही नेत्याविना आणि ध्यानाच्या किंवा कामाच्या कोणत्याही प्रणालीविना काम करणं. अशी बरीच माणसं आहेत ज्यांचं चित व्यवसाय, कुटुंब आणि त्यांच्या जीवनातील इतर गोष्टी ह्यामुळे विचलित होत असतं, आणि त्यामुळे ती स्वत:ला शिकवणुकीमध्ये पूर्णपणे झोकून देऊ शकत नाहीत. म्हणूनच, प्रत्येक व्यक्ती इथे स्वेच्छेने येते - इच्छा असेल तर चिंतन करण्यासाठी, शिकवणीचा अभ्यास करण्यासाठी आणि इच्छा असल्यास शारिरीक मेहनतीचं काम करण्यासाठी!

तेव्हा, प्रामुख्याने ही जागा ज्यांना सहकार्याच्या भावनेने एकत्र यावसं वाटतं त्यांच्यासाठी आहे. सहकार्याची भावना म्हणजे एखाद्या उद्दिष्टासाठी, आदर्शासाठी किंवा अधिकारासाठी एकत्र काम करणं नव्हे. पण एखादी व्यक्ती जेव्हा शारिरीक काम करत असते, तेव्हा त्या व्यक्तीला अचानकपणे सखोल आकलन करून देणारी जाणीव होऊ शकते, जिच्याबद्दल ती व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीबरोबर बोलू शकते; त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीबद्दल इतर व्यक्ती प्रश्न विचारू शकतात, शंका उपस्थित करू शकतात. पण त्या दोघांनीही अनुभवलेलं ते सखोल आकलन कोणा एकाचं असूच शकत नाही.

आकलन हे कधीही वैयक्तिक नसतं. असा सहभाग म्हणजेच सहकार्य.  
जे. कृष्णमूर्ती, ऋषी व्हॅली, २४ डिसेंबर १९८३
कृष्णमूर्ती त्यांच्या निधनापूर्वीची अनेक वर्षं फाउंडेशनच्या विश्वस्तांबरोबर, जे काही शाळांमधून मुलांसाठी केलं जात होतं, त्यापलीकडे जाऊन काही करण्याच्या शक्यतेबद्दल बोलत असत. त्यांना अशी केंद्रं घडवून आणायची होती, जिथे पुस्तकं असतील, ध्वनिमुद्रणं, ध्वनिचित्रफिती (ऑडिओ, व्हिडिओ टेप्स) असतील आणि अभ्यास आणि चिंतन करण्यासाठी पूरक असं वातावरण असेल.

राजघाट(वाराणसी), ऋषी व्हॅली, बंगलोर, उत्तरकाशी, सह्याद्री, कोलकाता, कटक येथे अध्ययन केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. ह्यातील बरीच केंद्र अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी वसवण्यात आली आहेत आणि तेथील शांततामय वातावरण आत्मचिंतन करण्यास आणि कृष्णमूर्तींच्या जीवनदृष्टीचं गहन अध्ययन करण्यास पूरक आहे.

ही केंद्रं इतर स्थानिक शाळा, महाविद्यालयांमधून आणि सार्वजनिक ठिकाणी कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांच्या ध्वनिचित्रफिती दाखवण्याच्या कार्यक्रमांचं आणि संवाद-सत्रांचं आयोजन करत असतात.

मी जर अध्ययन केंद्रात गेलो, तर सर्वात आधी मला शांत राहावसं वाटेल, तिथे माझ्या समस्या घेऊन मी जाणार नाही, माझ्या घरगुती समस्या, धंदा-उद्योगातले प्रश्न आणि अशाच इतर काही गोष्टी मी नेणार नाही. 
असं म्हणुया की तुमच्यासारखा एखादा माणूस ह्या नव्या अध्ययन केंद्रात येतो, तुम्ही ह्या जागी येण्यासाठी बरीच खटपट करता, आणि पहिले काही दिवस तुम्हाला शांत राहावंसं वाटू शकेल. तुम्ही जर संवेदनशील असाल तर इथे तुमच्या घरापेक्षा काहीतरी निराळं आहे, एखाद्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी जाण्याहून अगदी पूर्णपणे निराळं, ह्याची तुम्हाला जाणीव होईल. मग तुम्ही अध्ययनाला सुरुवात करता, केवळ तुम्हीच नाही, तर इथे राहणारे सर्वजण अध्ययन करत असतात, निरीक्षण करत असतात, प्रश्न उपस्थित करत असतात. आणि प्रत्येक जण खरोखर स्वत:च्या पूर्ण अस्तित्वानिशी ऐकत असतो. तेव्हा साहजिकच इथे धर्मशील वातावरण निर्माण होतं.
जे. कृष्णमूर्ती