जनसंपर्क

विविध ठिकाणची कृष्णमूर्ती शिक्षण केंद्रं स्थानिक जनतेशी सातत्याने संवाद साधून सामाजिक दृष्ट्या लाभदायी अशा उपक्रमांना चालना देतात.

कोलकाता आणि मुंबई ह्या शहरांमधल्या लहान केंद्रांतर्फे कृष्णमूर्तींच्या व्याख्यानांच्या ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येतात आणि संवाद-सत्रं आयोजित करण्यात येतात. शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींसाठी कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित परिसंवादांचं आयोजन करण्यात येतं; शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कृष्णमूर्तींच्या साहित्याचं वाचन आणि चर्चा आयोजित करण्यात येतात. स्थानिक पुस्तक प्रदर्शनातही केंद्रांचा सहभाग असतो. 
ग्रामीण जनसंपर्क
समाजातील वंचित गटांबद्दल कृष्णमूर्तींना अपार सहानुभूती वाटत असे. म्हणूनच वाराणसीतील राजघाट येथील शाळेमध्ये त्यांनी त्यांचे स्नेही आणि समाजवादी विचारसरणीचे अच्युत पटवर्धन ह्यांना स्थानिक जनतेबरोबर सातत्याने संवाद साधण्यासाठी बोलवलं. गेल्या साठ वर्षात राजघाट शिक्षण केंद्राच्या ह्या उपक्रमामुळे शिक्षण, आरोग्य आणि महिला-सक्षमीकरण ह्या गोष्टींना चालना मिळून, ह्या समाजाला आपल्या समस्या सोडवून स्वयंपूर्ण बनण्याची ताकद मिळाली आहे. परिसरातील ग्रामीण जनतेबरोबर सौहार्दपूर्ण नातं जोडून परस्परांचा आदर करणं हे ह्या उपक्रमांचं मुख्य उद्दिष्ट आहे.

ऋषी व्हॅली शिक्षण केंद्राची स्थापना झाली तेव्हा तेथील परिसर ओसाड होता आणि त्यामुळेच ऋषी व्हॅली केंद्रातील लोकांना शिक्षणाच्या माध्यमातून येथील गावांमध्ये बदल घडवून आणण्याची प्रेरणा मिळाली. मग त्यांनी तेथील जमिनीची काळजी घेणं, त्यांच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाची आणि साधनांची स्थानिक जनतेबरोबर देवाणघेवाण करणं आणि त्यांना त्यांच्या गावांमध्ये हिरवाई आणण्यासाठी मदत करणं ह्यासारखे प्रकल्प हाती घेतले. गेल्या तीन दशकांमध्ये ह्या केंद्राने ग्रामीण शिक्षण, आरोग्य, वनीकरण, जैवविविधतेचं संरक्षण आणि पाणलोट प्रकल्प अशा माध्यमांतून स्थानिक जनतेशी जवळीक साधली आहे. आता तिथे १५ शाळांची एक साखळी निर्माण केली आहे, तसंच एक शिक्षक प्रशिक्षण केंद्र आणि एक अभ्यासक्रम विकास विभाग (RIVER), स्वच्छता आणि आरोग्य-रक्षण कार्यक्रम आणि वनौषधी विभाग ह्या सारख्या प्रकल्पांचीही जोड देण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये बंगलोर शिक्षण केंद्राने शाळेच्या नियमीत उपक्रमांबरोबर अनेक अभिनव उपक्रमांना चालना दिली आहे. ह्या अंतर्गत तिथे नृत्य-नाट्य कला, दृष्य कला आणि कारागिरी ह्या विषयांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. ह्यामध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून अनेक कलावंत, कारागीर येत असतात. इतर शाळांमधील विद्यार्थी आणि आसपासच्या गावांमधील मुलंसुद्धा ह्यामध्ये सहभागी होतात. 
बंगलोर शिक्षण केंद्राने कायगल पर्यावरण आणि शैक्षणिक कार्यक्रम (KEEP) हा अभिनव कार्यक्रम विकसित केला आहे. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचं त्यांच्या परिसराबरोबर असलेल्या नात्याचं निरीक्षण करण्याचा आणि ह्या नात्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ह्या कार्यक्रमाचं केंद्र आंध्रप्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातील पालमनेर घाटामधल्या कायगल खोर्‍यामध्ये आहे. ’कीप’ ह्या प्रकल्पाची सुरुवात जंगल संवर्धनाने झाली. आता ह्या प्रकल्पाचा व्याप वाढला आहे. पर्यावरणशास्त्र व संवर्धन ह्या विषयांवरील संशोधनासाठी ह्या क्षेत्रात काम करणार्‍या प्रसिद्ध संस्थांची मदत घेण्यात येत आहे. ह्या प्रकल्पाअंतर्गत स्थानिक आदिवासी मुलांना शिक्षण देणं आणि प्रौढांसाठी उपजिविकेच्या अनेक नव्या वाटा खुल्या करणं ह्या गोष्टीही साध्य झाल्या आहेत. ह्या बहुआयामी कार्यक्रमामुळे मुलं आणि इथला एकूण समाज ह्या दोघांचाही आत्मविश्वास वाढून त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळत आहे.

सह्याद्री शिक्षण केंद्राने ग्रामसंपर्क आणि पर्यावरण संवर्धन ह्या गोष्टींच्या संदर्भात पुढाकार घेतला आहे. संस्थेने हाती घेतलेल्या दोन महत्वपूर्ण कार्यक्रमांमध्ये पारंपरिक बियाणांचं जतनीकरण कार्यक्रम आणि परिसरातील गावांमध्ये निर्धूर चूल कार्यक्रम ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.