प्रकाशनं

कृष्णमूर्तींची असंख्य भाषणं, मुलाखती, पुस्तकं, असं मौलिक विचारधन आपल्यासाठी उपलब्ध आहे

सतत सहा दशकांहूनही अधिक काळ कृष्णमूर्तींनी जगभरातील विविध देशांमधील लोकांपुढे भाषणं दिली, गटचर्चा केल्या. अनेक शास्त्रज्ञांबरोबर, विचारवंतांबरोबर, धार्मिक प्रमुखांबरोबरही चर्चा केल्या. सुरुवातीला ह्या भाषणांची व चर्चासत्रांची शब्दश: नोंद करून नंतर त्यातील मजकूर वाचकांपर्यंत पोचवला जात असे. नंतरच्या काळात तिथे ध्वनीमुद्रण आणि पुढे दृकश्राव्यमुद्रण करण्यात येत असे.

कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या प्रकाशन विभागातर्फे अनेक प्रकारच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं जातं. त्यात कृष्णमूर्तींची असंख्य व्याख्यानं, प्रश्नोत्तरांची सत्रं, कृष्णमूर्तींनी केलेलं लेखन, त्यांनी लिहिलेली पत्रं, त्यांची रोजनिशी, विशिष्ट विषयसूत्रांनुसार केलेली संकलनं, तसंच त्यांच्या जीवनचरित्रांचा समावेश आहे.

फाउंडेशनतर्फे इंग्रजीमधून वर्षातून तीन वेळा बुलेटिन प्रकाशित केले जातात. त्यामधून वाचकांना पूर्वी प्रसिद्ध न झालेले उतारे, तसंच फाउंडेशनच्या कार्यक्रमांबद्दल माहिती पुरवली जाते. वाराणसी येथील अध्ययन केंद्रातर्फे हिंदीमध्ये ’परिसंवाद’ नावाचं बुलेटिन प्रसिद्ध केलं जातं. 

इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांची विविध भारतीय भाषांमधली भाषांतरं उपलब्ध आहेत. त्यात हिंदी, मराठी, गुजराथी, बंगाली, ओडिया, मल्याळी, तमिळ, कन्नड, तेलगू, उर्दू, नेपाळी इ. चा समावेश आहे. तसंच इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी, ओडिया, तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड ह्या भाषांमधून नियमीतपणे वृत्तपत्रिका प्रकाशित केल्या जातात.
कृष्णमूर्तींनी दिलेली जाहीर व्याखानं, शिवाय प्रश्नोत्तर सत्रं, अनेकांबरोबर - शास्त्रज्ञ, विचारवंत, शिक्षक, विद्यार्थी, मानसशास्त्रज्ञ, धर्मज्ञ इ. बरोबर - झालेल्या त्यांच्या संवादांच्या ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) उपलब्ध आहेत. विशिष्ट विषयसूत्रानुसार संकलन केलेले संचही ह्यात समाविष्ट आहेत. काही भारतीय भाषांमधून ह्या ध्वनीचित्रफितींना उपशिर्षकंही उपलब्ध आहेत.

कृष्णमूर्तींची जीवनदृष्टी समजून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांची पुस्तकं अभ्यासणं, त्यांच्या व्याख्यानांचे व्हिडिओ इ. ऐकणं, पाहणं. माणसाचा जो सुखाचा शोध सतत चाललेला आहे त्याचा अर्थ, संदर्भ आणि त्यातील लहानसहान थर, पदर एखाद्या नामवंत शल्यविशारदाप्रमाणे जे. कृष्णमूर्ती उकलून दाखवतात. सध्याच्या हिंसामय, भयग्रस्त, विषारी राष्ट्रवादाच्या, प्रचंड आणि वेगाने घडणार्‍या तांत्रिक प्रगतीच्या जगात व्यक्तीला आपलं स्वातंत्र्य टिकवून धरण्यासाठी, शांततेने जीवन जगण्यासाठी येणार्‍या अडचणींची, अडथळ्यांची कृष्णमूर्ती चर्चा करतात.

कृष्णमूर्तींच्या शिकवणुकीची ओळख करून घेण्यासाठी खालील पुस्तकांच्या वाचनाने सुरुवात करणं उपयुक्त ठरेल:
ज्ञातापासून मुक्ती
प्रथम अर्थात अंतिम मुक्ती
हिंसावृत्तीच्या पलिकडे
जीवनभाष्ये खंड १-३
शिक्षण-संवाद