काही चिंतनं

  •    
  • नातेसंबंध
  • प्रतिमा बनवणे
  • तुम्ही आणि समाज
  • विभाजन
  • संघर्ष
  • हिंसा
  • धर्मशील मन
  • ध्यान
दोन मित्रांप्रमाणे...

एखाद्या छानशा दिवशी बागेत निवांत बसलेल्या दोन मित्रांप्रमाणे आपण आयुष्याबद्दल बोलतो आहोत, आपल्या समस्यांबद्दल बोलतो आहोत, अस्तित्वाच्या अवघ्या स्वरूपाची चिकित्सा करत आहोत, आणि जीवन ही एक मोठी समस्या का बनलं आहे असा प्रश्न स्वतःला विचारतो आहोत. आपण बौद्धिकदृष्ट्या खूप सुज्ञ, अभिरुचीपूर्ण असूनदेखील रोजच्या जगण्यात आपला पिट्टा पडतोय, त्यात काही अर्थ उरलेला नाही... जीवन, आपलं दैनंदिन आयुष्य इतकं यातनामय का बरं बनलं आहे? आपण नियमित चर्चमधे जात असलो, कुण्या राजकीय वा धार्मिक नेत्याचे अनुयायी असलो तरीही रोजच्या जगण्यात प्रचंड गोंधळ, घालमेल असतेच; काही काळ सुख लाभतं, अधूनमधून आनंदाचे क्षण येतात परंतु आयुष्यावर सदैव काळोखं सावट पसरलेलं असतं. आणि 'रोजचं आयुष्य कोणत्याही समस्येविना जगणं मुळात शक्य आहे का' याबद्दल तुम्ही व वक्ता काहीशा जिव्हाळ्याने, कळकळीने, आस्थेने, मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधत आहात.
'दि नेटवर्क ऑफ थॉट', पान ९९
परस्पर संबंधांचा आरसा
आपले नातेसंबंध हा आरसा असतो ज्यात आपण जसे असतो तसे स्व:त:ला पाहू शकतो. आपलं सर्व जीवन म्हणजे नातेसंबंधामधली वाटचाल असते. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जिचं कशाना कशाशी नातं नाही. सर्वांपासून दूर जाऊन, एकाकीपणे राहणार्‍या  एखाद्या साधूचंही भूतकाळाशी नातं असतं, त्याच्या सभोवती असलेल्यांशी त्याचं नातं असतं. नातेसंबंधांपासून आपली सुटका नसते. आरशासमान असणाऱ्या त्या नातेसंबंधांमध्ये आपण स्वत:ला पाहू शकतो, आपण खरोखर कसे आहोत त्याचा शोध घेऊ शकतो, आपल्या प्रतिक्रिया, आपले पूर्वग्रह, आपली भीती, आपलं मानसिक नैराश्य, आपल्या विवंचना, आपला एकाकीपणा, आपलं दु:ख, आपल्या यातना, आपला शोक हे सारे काही पाहू शकतो. आपण प्रेम करतो का की मग प्रेम अशी काही गोष्टच नाही, ह्याचाही आपण शोध घेऊ शकतो. तेव्हा आपण नातेसंबंधाचा प्रश्न तपासून पाहुया कारण तोच प्रेमाचा पाया असतो.
माईंड विदाउट मेझर, पृ. ७९

परस्परसंबंधातच आपले अस्तित्त्व आहे
निजबोध किंवा स्वत:विषयीचे आकलन हे समाजापासून स्वत:ला अलग करण्याच्या प्रक्रियेतून होत नसते किंवा अवास्तव कल्पनांच्या मागे जाण्यानेही होत नसते. तुम्ही आणि मी जर या गोष्टीचा अतिशय काळजीपूर्वक आणि सखोलतेने शोध घेऊ शकलो, तर निजबोधाचे आकलन केवळ परस्परसंबंधांतूनच घेऊ शकते असे आपल्या लक्षात येईल; एकटेपणातून, इतरांपासून तुटून जाण्याच्या प्रक्रियेतून ते होत नसते. तुम्ही एकाकीपणे राहूच शकत नाही. जगणे म्हणजेच परस्परसंबंध अस्तित्वात असणे. परस्परसंबंधाचा हा आरसाच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करण्यास मदत करेल, म्हणजेच परस्परसंबंधातील माझे विचार, भावना आणि कृती याबाबत मी अतिशय जागरुक असायला हवे. ही कठीण गोष्ट नाही किंवा त्यासाठी महत्प्रयासाची गरज नाही. जशी प्रत्येक नदी ही उगमापाशी एक छोटीशी धारा असते, जसजशी ती पुढे पुढे वहात जाते तसे तिला अनेक लहान ओहोळ येऊन मिळतात आणि तिचे पात्र अधिकाधिक रुंद आणि खोल होत जाते - तसेच हे आहे. या गोंधळ आणि अराजक माजलेल्या जगात तुम्ही जर विचारपूर्वक, काळजीपूर्वक, संयमाने, धि:कार न करता आपल्या परस्परसंबंधांकडे जागरुकतेने पाहिले तर तुम्हाला जाणवेल की ही एक अखंड चालणारी प्रक्रिया कशी जोर धरते, अधिकाधिक गतीमान होत जाते आणि हे ही जाणवेल की ती कालविरहित असते.
द कलेक्टेड वर्क्स खंड ६, पृ. ३७-३८
   
परस्परसंबंधं म्हणजे पळवाटीचे साधन
परस्परसंबंध हे जेव्हा स्वतःचे रूप प्रकट करण्याची प्रक्रिया बनते, परस्परसंबंधाच्या कृतीमध्येच जेव्हा स्वतःचे स्वरूप उघड होत असते, तेव्हाच परस्परसंबंधाला खरा अर्थ प्राप्त होतो. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना परस्परसंबंधात असे आपले रूप प्रकट होणे नको असते. वस्तुत: परस्परसंबंधाचा वापर आपण आपल्यातील अपुरेपणा, आपली दुःखे, आपल्यातल्या विसंगती झाकण्यासाठी करत असतो. त्यामुळे परस्परसंबंध ही फक्त औपचारिकता बनते. जोपर्यंत परस्पसंबंधामध्ये स्वतःचा शोध घेण्याची क्षमता नसते; तोपर्यंत परस्परसंबंध हे क्लेशदायक असतात. हे तुमच्या लक्षात आले का ते मला माहित नाही आणि असे परस्परसंबंध स्वतःपासून पलायन करण्याचे केवळ एक साधन बनतात.
द कलेक्टेड वर्क्स खंड ५, पृ. २३०, ओहाय १७ जुलै १९४९, दुसरे जाहीर व्याख्यान

परस्परसंबंधातून निजबोध
स्वज्ञान, आत्मज्ञान हे कोणत्याही सूत्राच्या आधारे करुन घेता येत नसते. तुम्ही स्वत:बद्दल जाणून घेण्यासाठी एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाल किंवा मनोविश्लेषकाकडे जाल, परंतु ते स्वज्ञान नसेल. जेव्हा आपण आपल्या परस्परसंबंधाबाबत जागरुक असतो -  ज्यामुळे आपल्याला क्षणोक्षणी आपले स्वत:चे खरे रूप दिसत असते - तेव्हाच निजबोध किंवा आत्मज्ञानाचा प्रत्यय आपल्याला होत असतो. परस्परसंबंध हा एक आरसा आहे त्यामध्ये आपण वस्तुत: कसे आहोत ते पाहू शकतो. पण परस्परसंबंधामध्ये आपले रूप पाहण्यास आपल्यापैकी बहुतेकजण असमर्थ असतात, कारण आपल्याला जे दिसते त्याचा आपण लगेच धि:कार करतो किंवा त्याचे समर्थन करतो. ‘जे आहे’ त्याचे वस्तुनिष्ठपणे निरीक्षण न करता आपण त्याबद्दल आपले मत बनवतो, त्याचे  मूल्यमापन करतो, त्याची तुलना करतो, ती गोष्ट स्वीकारतो किंवा नाकारतो; बहुतेकांना हीच सर्वात कठीण गोष्ट आहे असे वाटते; परंतु परस्परसंबंधांचे असे निरीक्षण हीच निजबोधाची सुरुवात असते.
द कलेक्टेड वर्क्स खंड ९, पृ. १३७

दूरवर जाण्यासाठी आपल्याला जवळूनच सुरुवात करावी लागते
असे पहा, खरोखर दूरवर जाण्यासाठी आपल्याला जवळूनच सुरुवात करावी लागते - मोठ्या क्रांतिकारी गोष्टी करण्याची सुरुवात लहान लहान गोष्टींपासूनच झाली पाहिजे; परंतु असे लहान गोष्टींपासून सुरूवात करणे आपल्यापैकी बहुतेकांना कठीण जाते. कारण आपल्याला ‘ जे आहे ‘ ते किंवा आपण जसे आहोत त्या वस्तुस्थितीपासून पलायन करायचे असते. आत्मबोधाशिवाय आपण असाधारण गोष्टी करण्यास असमर्थ असतो. आपले अस्तित्व म्हणजे परस्परसंबंधात जगणे. परस्परसंबंधाशिवाय आपले अस्तित्व असूच शकत नाही. त्यामुळे परस्परसंबंधाचा प्रश्न हा निकडीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नापलिकडे जाण्यासाठी परस्परसंबंधाचे आकलन करुन घेणे महत्वाचे आहे. परंतु आपण मात्र जे दूरवर आहे - ज्याला आपण ईश्वर किंवा सत्य म्हणतो - त्याचा वाटेकडे डोळे लावून बसलेलो असतो आणि आपल्या परस्परसंबंधामध्ये मूलभूत क्रांती घडवून आणण्याकडे दुर्लक्ष करतो. पण खरे तर ईश्वराच्या किंवा सत्याच्या नावाने आपण जी पळवाट शोधून काढलेली असते, ती पूर्णपणे  काल्पनिक आणि अवास्तव असते.  परस्परसंबंध ही एकच गोष्ट आपल्यापाशी आहे आणि ती समजून घेतल्याशिवाय आपण सत्याप्रत, ईश्वराप्रत पोहोचू शकणार नाही. म्हणूनच समाजामध्ये, समाजरचनेमध्ये जर आमूलाग्र बदल  घडवून आणायचा असेल तर प्रत्येकाने आपले परस्परसंबंध सुधारायला हवेत आणि माणसामाणसातील हे सुधारित परस्परसंबंध हीच आपल्या स्वत:मधील  आमूलाग्र परिवर्तनाची सुरुवात असेल. 
द कलेक्टेड वर्क्स खंड ६, पृ. १३७
दोन प्रतिमांमध्ये नाते असते
आपण ह्या पृथ्वीवर लाखो वर्षे राहत आलो आहोत आणि तरीही आपल्याला नातेसंबंधांचा प्रश्न सोडविता आला नाही, असं का बरं आहे?असं आहे का की आपल्या प्रत्येकाजवळ विचारांमधून तयार झालेली अशी आपली स्वत:ची एक विशिष्ट प्रतिमा आहे, आणि आपलं नातं दोन प्रतिमांवर आधारित आहे - पुरुषाने स्त्रीबद्दल रचलेली प्रतिमा आणि स्त्रीने त्या पुरुषाबद्दल बनवलेली प्रतिमा. तेव्हा ह्या नातेसंबंधामध्ये आपण दोन प्रतिमा एकत्र राहाव्यात तसे आहोत. हे वास्तव आहे. शक्य असल्यास मी दाखवून देऊ इच्छितो की की तुम्ही जर अतिशय बारकाईने स्वत:चं निरीक्षण केलंत, तर तुम्हाला दिसून येईल की तुम्ही तिच्याबद्दल मनात एक प्रतिमा बनवली आहे आणि तिने तुमच्याबद्दल एक चित्र मनात उभं केलं आहे, एक शाब्दिक रचना. तेव्हा ह्या दोन प्रतिमांमध्ये नातं आहे. ह्या प्रतिमा विचाराने रचलेल्या असतात. आणि विचार म्हणजे प्रेम नव्हे.
द नेटवर्क ऑफ थॉट, पान ८७

दोन समांतर रेषा
आपण दोन व्यक्तींमधील तसेच स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्परसंबंधाचं वस्तुनिष्ठपणे आकलन करत आहोत. आपण विचारत आहोत की, परस्परसंबंधामध्ये इतका संघर्ष, अस्वस्थता, दु:ख असण्याचं कारण काय आहे? दोन व्यक्तींच्या किंवा पती-पत्नींच्या परस्परसंबंधात मानसिकदृष्ट्या सुव्यवस्था असते का? शारीरिक गरजेतून ते एकमेकांशी संबधित असतीलही, परंतु अंतरंगात, जाणीवेच्या सूक्ष्म स्तरावर मात्र ते दोन समांतर रेषांप्रमाणेच जगत असतात, नाही का? प्रत्येकाला आपल्या पद्धतीने आयुष्य जगायचं असतं; आपापल्या इच्छा, आकांक्षांची पूर्ती करायची असते, नाही का? म्हणजेच जशा दोन समांतर रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत त्याप्रमाणे दोन व्यक्ती परस्परसंबंधात एकमेकांना ख-या अर्थाने भेटत नाहीत आणि त्यामुळेच तेथे विभाजन असतं, संघर्ष असतो आणि विफलता असते. आम्ही एकमेकांशी संबंधित आहोत असे ते म्हणतात, पण ते खरं नसतं, त्यात प्रमाणिकपणा नसतो. कारण प्रत्येकाने स्वत:बद्दल एक प्रतिमा कल्पिलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने आपल्या संबंधित व्यक्तीबद्दलही एक प्रतिमा कल्पिलेली आहे. त्यामुळे तेथे परस्परसंबंध हा दोन किंवा अनेक प्रतिमांमध्ये असतो.
द फ्लेम ऑफ अटेंन्शन, पान ७१

तुम्ही जीवनात दुखावले जात असता
असे पहा, तुम्ही लहानपणापासूनच इतरांकडून दुखावले जात असता. तुम्ही तुमच्या पालकांकडून दुखावले जाता. शाळेत किंवा महाविद्यालयात इतरांशी केल्या गेलेल्या तुलनेमुळे दुखावले जाता; किंवा एखाद्या विषयात प्रावीण्य मिळविण्यासाठी तुम्हाला स्पर्धेला तोंड देण्यास भाग पाडलंजातं; आणि हे असंच चालू रहातं. आयुष्यभर ही दुखावले जाण्याची प्रक्रिया चालूच राहते. सर्व मानवजात ही अशीच पिढ्यानपिढ्या दुखावली गेली आहे आणि याची जाणीव त्यांना क्वचितच होते; यातूनच अनेक प्रकारचे मानसिक आजार उद्भवत आहेत. तुमच्या जाणीवेचे सर्व स्तर – जागृत जाणीवेचे आणि अगम्य जाणीवेचे सर्व स्तर दुखावले जातात. असं पहा, आपण कधीच न दुखावले जाणं शक्य आहे काय? कारण आपण जर दुखावले जात असू तर त्याची प्रतिक्रिया म्हणून आपण आपल्याभोवती एक भिंत बांधून घेतो किंवा परत दुखावले जाऊ नये म्हणून अशा नातेसंबंधातून अंग काढून घेतो. त्यातून भीती आणि एकटेपणाच संभवतो. आपण भूतकाळातील दुख-या जखमांपासून मुक्त होऊ शकतो का आणि आपण पुन्हा न दुखावले जाणं शक्य आहे का ? ही आपल्यापुढील खरी समस्या आहे, नाही काय?
द फ्लेम ऑफ अटेंन्शन, पान ८७-८८      
समाज ही आपल्या संबंधांची निष्पत्ती आहे
तुम्ही आणि तुमच्या भोवतालचे दु:ख, आणि तुमच्यामध्ये असलेला आंतरिक गोंधळ यांचे परस्परांशी काय नाते आहे? हे दु:ख हा सारा गोंधळ, ही विपन्नावस्था आपोआप, आपल्या आपण तर नक्कीच निर्माण झालेली नाही. त्याचे निर्माते तुम्ही व मीच आहोत. कोणतीही भांडवलशाहीची, हुकूमशाहीची, किंवा साम्यवादी समाजरचना त्याला जबाबदार नाही, तर तुम्ही व मीच आपल्या परस्परांशी होणाऱ्या आचरणातून ती निर्माण केलेली आहे. तुम्ही अंतरंगात जसे आहात त्याचेच प्रतिबिंब बाहेर जगावर पडलेले आहे; तुम्ही कसे आहात, तुम्ही कसा विचार करता, तुमच्या भावना कशा आहेत. रोजचे जीवन तुम्ही कसे व्यतीत करता त्या सर्वांचा प्रक्षेप बाहेर जगावर पडतो आणि जग त्यांचेच बनते. आपण जर विषण्ण असलो, संभ्रांत असलो, आपल्या अंत:करणात गोंधळ आणि अव्यवस्था असली, तर त्यांच्या प्रक्षेपाने जगही तसेच बनते. समाजही तसाच बनतो. कारण तुमच्या-माझ्यातील, मी आणि अन्य व्यक्ती यांच्यातील आचरणाचेच समाज हे स्वरुप असते. आपल्या संबंधाचे समाज हे फल आहे आणि आपले संबंध गोंधळाचे, अहंकारी, संकुचित, मर्यादित, राष्ट्राभिमानाचे असे असले, तर त्यांचेच प्रक्षेप आपण बाहेर पाडतो व जगातही अव्यवस्था निर्माण करतो.
प्रथम अर्थात अंतिम मुक्ति - तुम्ही आणि समाज

तुम्ही जे आहात तेच बाहेरचं जग आहे
ह्या गोंधळलेल्या आणि पाशवी जगामध्ये आपण बहुतेकजण आपलं स्वत:च असं एक खाजगी आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करीत असतो, आपण सुखशांतीने जगू शकू, आणि तरीही ह्या जगामधल्या गोष्टींसह राहू शकू असं आयुष्य. आपल्याला वाटतं की आपण संघर्ष, झगडे, वेदना, दु:ख यांनी भरलेलं जे जीवन जगत असतो ते दुर्दशा, विपत्ती आणि गोंधळाने भरलेल्या बाहेरच्या जगापासून वेगळं असतं. आपल्याला असं वाटतं की अत्याचार, युद्धं आणि दंगेधोपे, विषमता यांनी भरलेल्या बाह्य जगापेक्षा एक व्यक्ती - ’तुम्ही’ निराळे असता आणि आपल्या विशिष्ट वैयक्तिक जीवनापासून हे सारं पूर्णपणे निराळं असतं. केवळ तुमच्या आयुष्याकडे नव्हे, तर तुम्ही जेव्हा जगाकडेही बारकाईने बघाल तेव्हा तुम्हाला दिसून येईल की तुम्ही जे आहात - तुमचं दैनंदिन जीवन, तुम्ही ज्याबद्दल विचार करता, तुम्हाला जे काही वाटतं - तेच बाहेरचं जगही असतं, तुमच्या सभोवतालचं जग.
अमेरिकन विद्यार्थ्यांबरोबरील संवाद

माणसामाणसातील भेद
रशियन, अमेरिकन, ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन असा माणसामाणसांत, वंशावंशत, संस्कृती विरुध्द संस्कृती, विचारसरणी विरुध्द विचारसरणी असा भेद का आहे असा प्रश्न उभा राहतो का? का आहे हा अलगपणा? माणसानं तुझा प्रदेश, माझा प्रदेश अशी वाटणी, असा भेद का मांडला आहे? एखाद्या विशिष्ट गटात किंवा धार्मिक मतात, संप्रदायात आपण सुरक्षितता, स्वसंरक्षण तर शोधण्याचा प्रयत्न करीत नाही ना? कारण धर्मांनीसुध्दा माणसामाणसांत भेद निर्माण केलेले आहेत. हिन्दू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू इत्यादी भेद करुन माणसाला माणसाविरुध्द उभे केले आहे. राष्ट्रवाद, त्यातील अनर्थकारक देशभक्तीसह राष्ट्रवाद, हा खरोखरी उदात्तीकृत उच्च मानलेल्या स्वरुपातील टोळीवादच आहे. लहान किंवा मोठ्या टोळीत समान भाषेमुळे तसेच त्याच लोकभ्रमांमुळे, समान राजकीय, धार्मिक व्यवस्थेमुळे एकीची, एकपणाची भावना असते, आणि त्यात आपणाला सुरक्षित, संरक्षित, सुखीम समाधानीपणाचे आश्वासन वाटत असते. त्या सुरक्षेततेसाठी, समाधानासाठी दुसऱ्यांना पण त्याच प्रकारची सुरक्षिततेची, कशाशी तरी जोडलेले असल्याची भावना असते. अशांना ठार करायला आपण तयार असतेओ. एखाद्या गटाशी, निशाणाशी, धार्मिकविधींशी, इत्यादी सारुप्य पावण्याची ही जबरदस्त इच्छाच आपल्याला एक निश्चित स्थान आहे, आपली मुळे तिथे आहे, आपण अनिकेत असे भटके लोक नाही अशी भावना आपल्यात निर्माण करते.
कृष्णमूर्तींचा स्वत:शी संवाद

माणसाने या पृथ्वीचे भाग पाडले आहेत
ही धरती आपली आहे तुमची किंवा माझी नव्हे. आपल्याला येथे एकमेकाला नष्ट न करता, एकमेकाला मदत करत जगयचं आहे. ही काही स्वैर कल्पनात्मक निरर्थक बडबड नव्हे तर ती प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे. पण माणसाने या पृथ्वीचे भाग पाडले आहेत, आणि तो असे समजत असतो की त्या विशिष्टात त्याला सुख, सुरक्षितता आणि टिकाऊ समाधाचा अनुभव मिळेल. जो पर्यंत आमुलाग्र क्रांती होत नाही, आपण राष्ट्रीयता, विचारसरणी, धार्मिक भेद निपटून काढत नाही आणि मानसिक, आंतरिक दृष्टीने, बाह्य पुनर्घटना करण्यापूर्वी जागतिक संबंध प्रस्थापित करीत नाही, तो पर्यंत आपण युध्दे चालवून घेत राहणारच. तुम्ही रागाच्या भरात किंवा युध्द नावाच्या संघटित खुनाद्वारे दुसऱ्याला इजा केलीत, दुसऱ्यांना ठार केलेत तर तुम्ही – (तुम्हीच बाकीची मानवजात असता, बाकीच्यांशी लढणारे अलग माणूस नसता) तुम्ही स्वत:लाच नष्ट करीत असता.
कृष्णमूर्तींचा स्वत:शी संवाद
परस्परसंबंधातील संघर्षाचा अंत
आपण आपल्या परस्परसंबंधातील संघर्ष संपवू शकतो का, हे आपण तपासले पाहिजे. घरी, कार्यालयात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, नातेसंबंधातील संघर्षाचा अंत घडवून आणणे शक्य आहे काय? याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही निवृत्त होवून एखाद्या सन्यास घेतलेल्या तपस्याप्रमाणे जीवन जगावे किंवा आपल्या स्वत:च्या अवास्तव कल्पनाविश्वात अडकून पडावे. किंबहुना या जगात राहून आपल्या जीवनातील संघर्षाचे आकलन करुन घ्यावे असा त्याचा अर्थ आहे. कारण जोपर्यंत आपल्यामधे विसंगती असते तोपर्यंत आपले मन, ह्र्दय, मेंदू हे पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत. जेव्हा आपल्या अंतरंगात संघर्ष नसतो आणि त्यामुळे स्पष्टता असते; तेव्हाच आपण पूर्ण कार्यक्षम असू शकतो. जेव्हा आपले मन संघर्षमुक्त असते तेव्हाच तेथे स्पष्टता असू शकते. जीवशास्त्रीय द्रुष्टया मेंदूतील ज्या पेशींना आपण मन असे संबोधतो; ते मन जेव्हा जीवनातील विसंगतीपासून मुक्त असते तेव्हाच ते कोणत्याही संघर्षाविना कार्य करु शकते आणि तेव्हाच तेथे शांती नांदते.
द कलेक्टेड वर्क्स खंड १६, पृ. ४

संघर्षाचे समग्र आकलन

आपल्यामधील संघर्षाच्या स्वरुपाचे आकलन करुन घेण्यामध्ये फक्त एखाद्या व्यक्तिगत संघर्षाबद्द्ल जाणून घेणे एवढेच अभिप्रेत नसते, तर आपल्या मानवी जीवनातील समग्र संघर्षाचे, म्हणजेचज्यामध्ये राष्ट्रीयत्व, वर्गसंघर्ष, महत्वाकांक्षा, हाव, मत्सर, प्रतिष्ठा, सत्तेची लालसा, वर्चस्व, भय, अपराधीपणा, चिंता, मृत्यु, ध्यानधारणा या समग्र भावभावनांचे अवलोकन करणे अभिप्रेत असते. ही जीवनप्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण जीवनाचा चौकसपणे शोध घेतला पाहिजे, निरीक्षण केले पाहिजे. आणि हे करत असताना जीवनाच्या एखाद्या कोप-याकडे न पहाता,जीवनाच्या संपूर्ण न
काशाकडे पहाणे आवश्यक असते. परंतु आपल्यापुढील समस्या ही आहे की आपण जीवन तुकडयातुकडयात जगत असतो. आपण जीवनाचे भाग पाडले आहेत. त्यात तुम्ही कधी अभियंता असाल, तर कधी कलावंत, कधी वैज्ञानिक, कधी उद्योजक, वकील आणि हे असे विभाजीत जीवन जगणे चालूच रहाते. आणि त्यातील प्रत्येक तुकड्याचे दुस-याशी युद्ध सुरुच रहाते, त्यांचे एकमेकांवर कुरघोडी करणे चालूच रहाते.      
द कलेक्टेड वर्क्स खंड १६, पृ. ४-५
हिंसेचे खोलवरचे स्तर
हिंसा म्हणजे काही केवळ दुसऱ्याला ठार मारणे नव्हे. आपण तिखट शब्द बोललो, एखाद्याला हाकलून देण्यासाठी हात झिडकारण्यासारखे अंगविक्षेप केले, किंवा भयापोटी आपण दुसऱ्याचे मुकाट्याने ऎकले तरी ती हिंसा असते. तेव्हा हिंसा म्हणजे देवाच्या नावाने, समाजाच्या नावाने किंवा देशाच्या नावाने युध्दरुपी जी संघटित कत्तल केली जाते तेवढीच केवळ नव्हे. हिंसा ही त्यापेक्षा फार फार व्यापक व तरल आहे, खोल आहे, आणि हिंसकतेच्या अगदी खोलातल्या खोलात असणाऱ्या प्रकारांचाही आपण समाचार घेत आहोत.
तुम्ही स्वत:ला भारतीय, मुस्लीम, ख्रिश्चन किंवा युरोपियन इत्यादी म्हणवून घेता तेव्हा तुम्ही हिंसकच होत असता; कारण तुम्ही स्वत:ला सर्व जगापासून वेगळे काढीत असता- ही हिंसक वृत्ती तुमच्या लक्षात आली का? तुम्ही जेव्हा श्रध्दा, राष्ट्रीयत्व, परंपरा यातून स्वत:ला जगापेक्षा भिन्न कल्पित तेव्हा ते करणेच हिंस्रपणाला जन्म देते. म्हणून माणसाला हिंसकता समजून घ्यायची असेल तर तो कोणत्याही एका देशाचा, धर्माचा, राजकीय पक्षाचा किंवा पक्षविशिष्ट व एकांगी तत्वप्रणालीचा असणार नाही; संपूर्ण मानवतेच्या स्वरुपाचा बोध करुन घेण्यात त्याला स्वारस्य असते.
ज्ञातापासून मुक्ती

हिंसकतेचे एकूण स्वरुप
हिंसकतेचे वेगवेगळे कितीतरी प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारच्या हिंसकतेचा परामर्श आपण घ्यावा की हिंसकतेचे एकूण स्वरुपच पाहावे? हिंसकतेच्या एकाच भागाकडे न पाहता, आपण तिचा समग्र वर्णपटच पाहू शकतो काय? ‘मी’, अहं, ’स्व’, हाच हिंसकतेचे मूळ, उत्पत्तिस्थान असतो, तो कितीतरी प्रकारे प्रकट होत असतो – भेदांतून, कोणीतरी होण्याच्या किंवा बनण्याच्या प्रयत्नांतून प्रकट होतो. त्यातच आप-पर भेद येतो. त्यातच जागृत जाणीव व सुप्त अगम्य मनाची जाणीव असाही भेद येतो. आपले कुटुंब म्हणून ममत्व धरणारा मी किंवा कुटुंबाशी ममत्व न धरणारा मी, असा भेद येतो, आपली जात म्हणून ममत्व धरणारा मी किंवा जातीशी ममत्व न धरणारा मी इत्यादी अनेक प्रकारचे भेद येतात : एखाद्या तलावात दगड टाकावा तसे हे असते: लहरी वर्तुळाकार पसरतच जातात, आणि केंद्रस्थानी ‘मी’ असतो. जोपर्यंत ‘मी’ हा सूक्ष्म किंवा ढोबळ, कोणत्या तरी स्वरुपात टिकून असतो, तोपर्यंत हिंसावृत्ती असणारच.
हिंसावृत्तीच्या पलीकडे

अहिंसा ही वस्तुस्थिती नाही
अहिंसेचे महत्व पटवून देण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जातो. राजकीय, धार्मिक क्षेत्रांतील तुमचे बरेच नेते या गोष्टीला महत्व देतात. पण अहिंसा ही वस्तुस्थिती नाही; ती केवळ एक कल्पना, एक सिद्धात, शब्दांचा एक समूह आहे;आणि प्रत्यक्षात तुमची मनोवृत्ती हिंसक आहे ही वस्तुस्थिती आहे. हेच सत्य आहे. पण हे सत्य समजून घेण्याची कुवत आपल्यामध्ये नाही - म्हणूनच आपण अकारण अहिंसा या गोष्टीला इतके महत्व देत आहोत आणि त्यामुळे ‘ जे आहे’ आणि ‘ जे असावं’ यामध्ये संघर्ष निर्माण होतो. तुम्ही जेव्हा जेव्हा अहिंसेचं पालन करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा खरं तर तुमच्या मनात हिंसेची बीजं पेरली जात असतात. ही गोष्ट इतकी उघड आहे. म्हणूनच आपण एकत्र येऊन कोणतीही पळवाट न शोधता, कुठल्याही आदर्शांचं अनुसरण न करता किंवा त्याचं दमन न करता ’काय आहे’ त्याच्याकडे पाहू शकू का?    
द फ्लेम ऑफ  अटेन्शन, पान ७४

हिंसेच्या विरोधात अहिंसा हे तत्व उभं करण्याची खरोखर गरज आहे का?
माणूस सातत्याने अहिंसक बनण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळेच ’जे आहे’ - जी हिंसा असते आणि ’जे असावे’ - जी अहिंसा असते, ह्या दोन गोष्टींमध्ये संघर्ष असतो. ऊर्जेचा अपव्याय होण्याचं हे मुख्य कारण आहे. जोपर्यंत ’जे आहे’ आणि ’जे असावं’ ह्यामध्ये द्वंद्व असतं - माणूस कोणीतरी वेगळं बनण्याचा प्रयत्न करत असतो, ’जे असावं’ ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तो संघर्ष म्हणजे ऊर्जेचा अपव्यय असतो. जोपर्यंत ह्या परस्परविरोधी गोष्टींमध्ये संघर्ष असतो तोपर्यंत माणसामध्ये स्वत:ला बदलण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसते. पण हिंसेच्या विरोधात एक आदर्श म्हणून अहिंसा हे तत्व उभं करण्याची खरोखर गरज आहे का?
द फ्लाइट ऑफ द ईगल, पान ५६

धर्मशील मन म्हणजे काय हे प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी
फक्त धर्मशील मन आपल्या समस्यांचे निराकरण करू शकते, वैज्ञानिक मन हे अजिबात करू शकत नाही. धर्मर्शील मन म्हणजे काय हे - केवळ सैद्धांतिक दृष्टीने नव्हे, तर प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आपण चिन्हाचे फक्त संशोधन करायचे नसते, केवळ त्या प्रत्येक चिन्हाबद्दल प्रश्न उपस्थित करायचा नसतो, तर त्याच्या प्रभावाचीही चिकित्सा करणे आवश्यक असते. आपल्याला एखादी गोष्ट किती सहजपणे पटवली जाते, किती सहजपणे आपण एखाद्या कल्पनेच्या - खरे सांगायचे तर प्रचाराच्या आहारी जातो! किती सहजपणे आपल्या भावना एखाद्या नव्या गोष्टीमध्ये किंवा र्किवा नवीन वाटणार्‍या पळवाटेमध्ये गुंततात. आपण फक्त चिन्हांचेच गुलाम बनत नाही तर समाजातील सर्व प्रकारचे प्रभाव, परंपरा, कुटुंबाचे संस्कार, नाव, व्यवसाय, छापील शब्द, वृत्तपत्रे, पुस्तके, ग्रंथ ह्यांचा प्रभाव, हुशार समजल्या जाणार्‍या प्रसिद्ध विद्वानांचा, नेते समजल्या जाणार्‍या व्यक्तींचा प्रभाव अशा अनेक प्रभावांमुळे आपण गुलाम बनतो. किती सहजपणे आणि किती हानिकारकपणे आपण उलटसुलट पद्धतीने विचार करण्यास, एका विशिष्ट प्रकारे कृती करण्यास प्रभावित केले जातो आणि एखादी सवय किंवा पद्धत अनुसरण्यास प्रवृत्त केले जातो. प्रत्येक प्रभावाचा शोध घेणे, त्याविषयी जागृत होणे, अवधान देणे आणि तरीसुद्धा त्यामध्ये न अडकता तुम्ही एखादे पुस्तक वाचत असताना त्याच्या प्रभावाविषयी अवधान असणे, जागृत असणे, कुटुंबातील ताण-तणावाबद्दल जागृत असणे, ज्याचा संस्कृतीमध्ये - संस्कारामध्ये तुम्ही वाढला आहात त्याबद्दल अवधान असणे - ह्यालाच प्रज्ञाजागृती म्हणतात.
मद्रास १९६१, व्याख्यान ८

फक्त असेच मन क्रांतिकारी मन असते
धर्मशील मन हे खरे क्रांतिकारी असते. ती क्रांती अशी नसते की जी घडून गेलेल्या गोष्टीवरची प्रतिक्रिया असते, जसे साम्यवाद हा भांडवलशाही विरुद्ध असलेली प्रतिक्रिया आहे. तेव्हा अशी क्रांती ही मुळी क्रांती नसतेच. कोणतीही प्रतिक्रिया ही क्रांती नसते आणि म्हणून प्रतिक्रिया मूलभूत परिवर्तन आणू शकत नाही. फक्त धर्मशील मनच, जे मन स्वत:चा शोध घेत असते, ज्याला स्वत:च्या क्रिया-प्रतिक्रियांचे, स्वत:च्या कृतीचे भान असते - आणि हीच स्व-ज्ञानाची सुरुवात असते - फक्त असेच मन क्रांतिकारी मन असते आणि क्रांतिकारी मन मूलभूत बदल घडवून आणणारे मन असते, जे धर्मशील मन असते.

आजच्या काळाचे आव्हान आणि प्रत्येक गोष्टीचे आव्हान असे आहे की, तुम्ही जर खरोखर जागृत असाल तर एखाद्या नवीन गोष्टीला तुम्ही संपूर्णपणे कसे सामोरे जाल, कसा प्रतिसाद द्याल. प्रतिसाद देणे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपले सर्व मन एकवटून मेंदूच्या पूर्ण क्षमतेसह, पूर्ण हृदयापासून, अतंरंगामधून तुमच्या संपूर्ण शारीरिक क्षमतेसह, संपूर्णपणे, तुमच्या एकूण अस्तित्वाच्या क्षमतेनुसार सामोरे जाणे, प्रतिसाद देणे असते, फक्त बौद्धिकदृष्ट्या किंवा भावनिक होऊन किंवा भावविवशतेने सामोरे जाणे नव्हे. मला शंका आहे की तुम्ही कधी अशा रितीने कुठच्याही गोष्टीला सामोरे गेले असाल. असे पाहा, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे संपूर्णपणे एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देता तेव्हा स्व-केंद्रित कृतीचा तिथे अभाव असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला पूर्णपणे प्रतिसाद देता, त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, त्याच सेंकदाला, की तुमचा ‘स्व’ त्याच्या सर्व हालचालीसह, त्याचे भय, त्याच्या महत्त्वाकांक्षा, त्याचे क्रौर्य, त्याचे शत्रुत्व सर्व काही नाहीसे झालेले असते आणि म्हणूनच तुम्ही पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकता. आणि जेव्हा तुमच्यामध्ये संवेदनशीलता असते - जे खरे म्हणजे जीवन जगणे असते - तेव्हाच तुम्ही अशा प्रकारचा प्रतिसाद देता.
मद्रास १९६१, भाषण ८

पद्धत एक सवय म्हणून पूर्णपणे नाकारली पाहिजे
धार्मिक मन किंवा नवीन मन कसे अस्तित्वात येईल? तुम्ही एखादी पद्धत, प्रणाली का अनुसरता? एका प्रणालीमधून - प्रणाली म्हणजे एक पद्धत, सराव, पुन: पुन्हा, दिवसेंदिवस करता येणारी गोष्ट - नवीन मन निर्मार्ण करता येईल का? निश्चितच पद्धतीमागे सरावाचे सातत्य अभिप्रेत असते, एका विशिष्ट ध्येयासाठी, एका ठराविक दिशेने केलेली वाटचाल, ज्याचा उद्देश यांत्रिक सवय निर्माण करण्याचा असतो, आणि त्या यांत्रिक सवयींमधून यंत्रवत न झालेले असे मन साध्य करायचे असते.

जेव्हा तुम्ही ‘शिस्त’ असे म्हणता तेव्हा सर्व शिस्त एखाद्या साच्याप्रमाणे, एका पद्धतीवर आधारलेली असते आणि तो साचा तुम्हाला एका परिणामाची हमी देतो. जे परिणाम श्रद्धाळू मनाने अगोदरच निश्चित केलेले असतात, स्वीकारलेले असतात आणि असे मन अगोदरच एक भूमिका घेत असते. म्हणून एखादी पद्धत, त्या शब्दाच्या व्यापक किंवा किंवा संकुचित अर्थछटांनुसार नवीन मन निर्माण करेल काय? जर तसे नसेल तर पद्धत (method), एक सवय म्हणून पूर्णपणे नाकारली पाहिजे. कारण ती खोटी असते. पद्धतच मनाला त्याच्या अपेक्षित परिणामानुसार संस्कारित करते. मनाने विचाराच्या सर्व यांत्रिक प्रक्रिया टाकून दिल्या पाहिजेत. म्हणून पद्धती, प्रणाली, शिस्त, सवयीचे सातत्य ह्या सर्व गोष्टी नवीन मन निर्माण करतील ही कल्पना खोटी आहे. तेव्हा जे जे काही यांत्रिक असते, ते सर्व टाकून दिले पाहिजे. जे मन यांत्रिक असते ते पारंपरिक असते. ते प्रवाही, अयांत्रिक असलेल्या जीवनाला भिडू शकत नाही, सामोरे जाऊ शकत नाही. म्हणून पद्धती बाजूला काढली पाहिजे - सोडून दिली पाहिजे.
द  बुक ऑफ लाइफ: डेली मेडिटेशन्स् विथ कृषमूर्ती, ऑक्टोबर १८ 

धर्मशील मन कधीच उत्क्रांती किंवा विकासाच्या दृष्टीने विचार करीत नाही
धर्मशील मनाला अधिकार नसतो. म्हणून धर्मशील मन हे अनुकरण करणारे नसते. तुम्ही असे सुद्धा पाहाल की धर्मशील मन हे काळामध्ये अडकत नाही. ते उत्क्रांती, विकास किंवा क्रमाक्रमाने विचार करीत नाही. - ते प्राण्यांपासून आलेले मन असते. कारण मेंदूंचा काही भाग हा प्राण्यांपासून उत्क्रांत होत आलेला आहे. प्राण्यांपासून विकसित झालेला, प्राण्यांपासून उत्प्रेरित होत, ते अनुभव संग्रहित करीत विकसित झालेला आहे. तो मेंदूं काळामध्येच काम करीत असतो. म्हणून धर्मशील मन कधीच उत्क्रांति किंवा विकासाच्या दृष्टीने विचार करीत नाही. ते नेहमी काळाच्या बाहेरच उडी घेत असते, विचार करीत असते. मला वाटते की, तुम्हाला हे समजेल, जे कदाचित तुम्हाला नवीन आणि चमत्कारिक वाटेल, कारण उत्परिवर्तन  (mutation) म्हणजे मला हेच अभिप्रेत आहे.

बदलणारे मन, बदलणारा मेंदू हे नेहमीच ज्ञातापासून ज्ञाताकडे जात असतात. परंतु धर्मशील मन हे नेहमीच स्वत:ला ज्ञातापासून मुक्त करत असते. म्हणजे मग त्याला अज्ञाताचा अनुभव घेता येतो. अज्ञात हे कालातीत असते आणि ज्ञात हे कालसापेक्ष असते आणि म्हणून जर तुम्ही ह्यामध्ये सखोलपणे लक्ष घातले तर तुम्ही पाहाल की धर्मशील मन हे काळाचे गुलाम नसते. जर त्या मनाला आपण महत्त्वाकांक्षी आहोत, मत्सरी आहोत, भित्रे आहोत ह्याची जाणीव झाली तर ते त्याबद्दल आदर्शाच्या दृष्टीने, बदल घडवून आणणे पुढे ढकलण्याच्या दृष्टीने विचार करीत नाही. तर ते त्याचा तात्काळ अतं करते, त्या क्षणी, आणि त्या शेवट करण्यामध्येच त्या असामान्य, तरल, संवेदनक्षम जगण्याची सुरुवात होते जी बंधमुक्त असते, मुक्त असते.
मद्रास १९६१, व्याख्यान ८
मन जे कालातीत असतं
ध्यानासाठी अत्यंत स्थिर, पूर्णपणे स्तब्ध अशा मनाची गरज असते. मन जर स्तब्ध नसेल तर आपण श्रवण करू शकत नाही, शिकू शकत नाही. तुम्ही संचय करू शकता, पण संचय करणं म्हणजे शिकणं नव्हे. ज्ञानाचा संचय करणं ही गोष्ट आणि शिकणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. शिकणं ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, तर ज्ञान हे कालबद्ध आहे. आणि मृत्यूपासून मुक्त असलेल्या मनाच्या सौंदर्याचं भान असणं म्हणजे मन निर्भय असणं , असं मन जे पूर्णपणे रितं असतं आणि म्हणूनच कालातीत असतं.
नवी दिल्ली १९७२, जाहीर व्याख्यान ३

या जगातच एक त्रयस्थ होऊन राहिले पाहिजे

ध्यान म्हणजे जगापासून पलायन नव्हे. ही अलग पाडणारी, बंदिस्त करणारी कृती नव्हे तर जग आणि जगरीती यांचे आकलन म्हणजे ध्यान. जगाकडे तुम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा आणि मोठ्या दु:खाच्या जोडीने येणारे सुख या व्यतिरिक्त देता येण्यासारखे काही नाही.
ध्यान म्हणजे अशा या जगापसून दूर जाणे आहे. त्यासाठी या जगातच एक त्रयस्थ होऊन राहिले पाहिजे म्हणजे मग या जगाचा अर्थ कळू लागतो. पृथ्वी आणि तार्यां चे सौंदर्य शाश्वत असते. अशावेळी प्रेम हे ऐंद्रियसुख असत नाही. या ध्यानातून सर्व कृतीना आरंभ होतो आणि ती कृती मानसिक तणाव, विसंगती, स्वार्थमूलक धाव किंवा सत्तेची अहंमान्यता यांची परिणती असत नाही.

ध्यान म्हणजे अलगपणाचा अंत होय
कुत्र्याच्या भुंकण्याचा, लहान मुलाच्या रडण्याचा, जवळून जाणार्यास माणसाच्या हास्याचा आवाज आपण फारच क्वचित ऐकत असतो. आपण सर्व गोष्टींपासून स्वत:ला अलग करत असतो आणि त्या अलगपणातून सर्व गोष्टी पाहतो व ऐकतो. हा अलगपणा विनाशकारक असतो कारण त्यातच संघर्ष आणि गोंधळ वसत असतात. त्या घंटांचा नाद आपण संपूर्ण मौनातून ऐकलात तर तुम्हीच त्याच्यावर स्वार झालेले असता किंवा तो नाद तुम्हाला त्या दरीपलीकडे आणि टेकडीवरून घेऊन जाईल. जेव्हा तुम्ही आणि तो नाद वेगळा नसता, आणि त्याचाच एक भाग असता तेव्हा त्यातील सौंदर्याची ओळख पटते. ध्यान म्हणजे अलगपणाचा अंत होय. त्यातील अभिलाषा किंवा इच्छापूर्वक कृतीतून किंवा पूर्वी न चाखलेल्या वस्तूतील सुखोपभोगाच्या मागे लागण्याने अलगपणाचा अंत होत नसतो. म्हणजेच ध्यान होत नसते.
ध्यान ही जीवनापासून अलग अशी गोष्ट नसते. ते तर जीवनाचे, दैनंदिन जीवनाचे सार असते. तो घंटानाद ऐकणे, शेतकरी आपल्या कारभारणीबरोबर जात असता त्याचे हास्य ऐकणे, जवळून जाणार्या. बालिकेच्या सायकलवरील घंटीचा नाद ऐकणे जीवनाचा एखादा भाग नव्हे तर संपूर्ण जीवनच ध्यानाचे दार खुले करते.