धर्मशील मन म्हणजे काय हे प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी
फक्त धर्मशील मन आपल्या समस्यांचे निराकरण करू शकते, वैज्ञानिक मन हे अजिबात करू शकत नाही. धर्मर्शील मन म्हणजे काय हे - केवळ सैद्धांतिक दृष्टीने नव्हे, तर प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आपण चिन्हाचे फक्त संशोधन करायचे नसते, केवळ त्या प्रत्येक चिन्हाबद्दल प्रश्न उपस्थित करायचा नसतो, तर त्याच्या प्रभावाचीही चिकित्सा करणे आवश्यक असते. आपल्याला एखादी गोष्ट किती सहजपणे पटवली जाते, किती सहजपणे आपण एखाद्या कल्पनेच्या - खरे सांगायचे तर प्रचाराच्या आहारी जातो! किती सहजपणे आपल्या भावना एखाद्या नव्या गोष्टीमध्ये किंवा र्किवा नवीन वाटणार्या पळवाटेमध्ये गुंततात. आपण फक्त चिन्हांचेच गुलाम बनत नाही तर समाजातील सर्व प्रकारचे प्रभाव, परंपरा, कुटुंबाचे संस्कार, नाव, व्यवसाय, छापील शब्द, वृत्तपत्रे, पुस्तके, ग्रंथ ह्यांचा प्रभाव, हुशार समजल्या जाणार्या प्रसिद्ध विद्वानांचा, नेते समजल्या जाणार्या व्यक्तींचा प्रभाव अशा अनेक प्रभावांमुळे आपण गुलाम बनतो. किती सहजपणे आणि किती हानिकारकपणे आपण उलटसुलट पद्धतीने विचार करण्यास, एका विशिष्ट प्रकारे कृती करण्यास प्रभावित केले जातो आणि एखादी सवय किंवा पद्धत अनुसरण्यास प्रवृत्त केले जातो. प्रत्येक प्रभावाचा शोध घेणे, त्याविषयी जागृत होणे, अवधान देणे आणि तरीसुद्धा त्यामध्ये न अडकता तुम्ही एखादे पुस्तक वाचत असताना त्याच्या प्रभावाविषयी अवधान असणे, जागृत असणे, कुटुंबातील ताण-तणावाबद्दल जागृत असणे, ज्याचा संस्कृतीमध्ये - संस्कारामध्ये तुम्ही वाढला आहात त्याबद्दल अवधान असणे - ह्यालाच प्रज्ञाजागृती म्हणतात.
मद्रास १९६१, व्याख्यान ८
फक्त असेच मन क्रांतिकारी मन असते
धर्मशील मन हे खरे क्रांतिकारी असते. ती क्रांती अशी नसते की जी घडून गेलेल्या गोष्टीवरची प्रतिक्रिया असते, जसे साम्यवाद हा भांडवलशाही विरुद्ध असलेली प्रतिक्रिया आहे. तेव्हा अशी क्रांती ही मुळी क्रांती नसतेच. कोणतीही प्रतिक्रिया ही क्रांती नसते आणि म्हणून प्रतिक्रिया मूलभूत परिवर्तन आणू शकत नाही. फक्त धर्मशील मनच, जे मन स्वत:चा शोध घेत असते, ज्याला स्वत:च्या क्रिया-प्रतिक्रियांचे, स्वत:च्या कृतीचे भान असते - आणि हीच स्व-ज्ञानाची सुरुवात असते - फक्त असेच मन क्रांतिकारी मन असते आणि क्रांतिकारी मन मूलभूत बदल घडवून आणणारे मन असते, जे धर्मशील मन असते.
आजच्या काळाचे आव्हान आणि प्रत्येक गोष्टीचे आव्हान असे आहे की, तुम्ही जर खरोखर जागृत असाल तर एखाद्या नवीन गोष्टीला तुम्ही संपूर्णपणे कसे सामोरे जाल, कसा प्रतिसाद द्याल. प्रतिसाद देणे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपले सर्व मन एकवटून मेंदूच्या पूर्ण क्षमतेसह, पूर्ण हृदयापासून, अतंरंगामधून तुमच्या संपूर्ण शारीरिक क्षमतेसह, संपूर्णपणे, तुमच्या एकूण अस्तित्वाच्या क्षमतेनुसार सामोरे जाणे, प्रतिसाद देणे असते, फक्त बौद्धिकदृष्ट्या किंवा भावनिक होऊन किंवा भावविवशतेने सामोरे जाणे नव्हे. मला शंका आहे की तुम्ही कधी अशा रितीने कुठच्याही गोष्टीला सामोरे गेले असाल. असे पाहा, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे संपूर्णपणे एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देता तेव्हा स्व-केंद्रित कृतीचा तिथे अभाव असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला पूर्णपणे प्रतिसाद देता, त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, त्याच सेंकदाला, की तुमचा ‘स्व’ त्याच्या सर्व हालचालीसह, त्याचे भय, त्याच्या महत्त्वाकांक्षा, त्याचे क्रौर्य, त्याचे शत्रुत्व सर्व काही नाहीसे झालेले असते आणि म्हणूनच तुम्ही पूर्णपणे प्रतिसाद देऊ शकता. आणि जेव्हा तुमच्यामध्ये संवेदनशीलता असते - जे खरे म्हणजे जीवन जगणे असते - तेव्हाच तुम्ही अशा प्रकारचा प्रतिसाद देता.
मद्रास १९६१, भाषण ८
पद्धत एक सवय म्हणून पूर्णपणे नाकारली पाहिजे
धार्मिक मन किंवा नवीन मन कसे अस्तित्वात येईल? तुम्ही एखादी पद्धत, प्रणाली का अनुसरता? एका प्रणालीमधून - प्रणाली म्हणजे एक पद्धत, सराव, पुन: पुन्हा, दिवसेंदिवस करता येणारी गोष्ट - नवीन मन निर्मार्ण करता येईल का? निश्चितच पद्धतीमागे सरावाचे सातत्य अभिप्रेत असते, एका विशिष्ट ध्येयासाठी, एका ठराविक दिशेने केलेली वाटचाल, ज्याचा उद्देश यांत्रिक सवय निर्माण करण्याचा असतो, आणि त्या यांत्रिक सवयींमधून यंत्रवत न झालेले असे मन साध्य करायचे असते.
जेव्हा तुम्ही ‘शिस्त’ असे म्हणता तेव्हा सर्व शिस्त एखाद्या साच्याप्रमाणे, एका पद्धतीवर आधारलेली असते आणि तो साचा तुम्हाला एका परिणामाची हमी देतो. जे परिणाम श्रद्धाळू मनाने अगोदरच निश्चित केलेले असतात, स्वीकारलेले असतात आणि असे मन अगोदरच एक भूमिका घेत असते. म्हणून एखादी पद्धत, त्या शब्दाच्या व्यापक किंवा किंवा संकुचित अर्थछटांनुसार नवीन मन निर्माण करेल काय? जर तसे नसेल तर पद्धत (method), एक सवय म्हणून पूर्णपणे नाकारली पाहिजे. कारण ती खोटी असते. पद्धतच मनाला त्याच्या अपेक्षित परिणामानुसार संस्कारित करते. मनाने विचाराच्या सर्व यांत्रिक प्रक्रिया टाकून दिल्या पाहिजेत. म्हणून पद्धती, प्रणाली, शिस्त, सवयीचे सातत्य ह्या सर्व गोष्टी नवीन मन निर्माण करतील ही कल्पना खोटी आहे. तेव्हा जे जे काही यांत्रिक असते, ते सर्व टाकून दिले पाहिजे. जे मन यांत्रिक असते ते पारंपरिक असते. ते प्रवाही, अयांत्रिक असलेल्या जीवनाला भिडू शकत नाही, सामोरे जाऊ शकत नाही. म्हणून पद्धती बाजूला काढली पाहिजे - सोडून दिली पाहिजे.
द बुक ऑफ लाइफ: डेली मेडिटेशन्स् विथ कृषमूर्ती, ऑक्टोबर १८
धर्मशील मन कधीच उत्क्रांती किंवा विकासाच्या दृष्टीने विचार करीत नाही
धर्मशील मनाला अधिकार नसतो. म्हणून धर्मशील मन हे अनुकरण करणारे नसते. तुम्ही असे सुद्धा पाहाल की धर्मशील मन हे काळामध्ये अडकत नाही. ते उत्क्रांती, विकास किंवा क्रमाक्रमाने विचार करीत नाही. - ते प्राण्यांपासून आलेले मन असते. कारण मेंदूंचा काही भाग हा प्राण्यांपासून उत्क्रांत होत आलेला आहे. प्राण्यांपासून विकसित झालेला, प्राण्यांपासून उत्प्रेरित होत, ते अनुभव संग्रहित करीत विकसित झालेला आहे. तो मेंदूं काळामध्येच काम करीत असतो. म्हणून धर्मशील मन कधीच उत्क्रांति किंवा विकासाच्या दृष्टीने विचार करीत नाही. ते नेहमी काळाच्या बाहेरच उडी घेत असते, विचार करीत असते. मला वाटते की, तुम्हाला हे समजेल, जे कदाचित तुम्हाला नवीन आणि चमत्कारिक वाटेल, कारण उत्परिवर्तन (mutation) म्हणजे मला हेच अभिप्रेत आहे.
बदलणारे मन, बदलणारा मेंदू हे नेहमीच ज्ञातापासून ज्ञाताकडे जात असतात. परंतु धर्मशील मन हे नेहमीच स्वत:ला ज्ञातापासून मुक्त करत असते. म्हणजे मग त्याला अज्ञाताचा अनुभव घेता येतो. अज्ञात हे कालातीत असते आणि ज्ञात हे कालसापेक्ष असते आणि म्हणून जर तुम्ही ह्यामध्ये सखोलपणे लक्ष घातले तर तुम्ही पाहाल की धर्मशील मन हे काळाचे गुलाम नसते. जर त्या मनाला आपण महत्त्वाकांक्षी आहोत, मत्सरी आहोत, भित्रे आहोत ह्याची जाणीव झाली तर ते त्याबद्दल आदर्शाच्या दृष्टीने, बदल घडवून आणणे पुढे ढकलण्याच्या दृष्टीने विचार करीत नाही. तर ते त्याचा तात्काळ अतं करते, त्या क्षणी, आणि त्या शेवट करण्यामध्येच त्या असामान्य, तरल, संवेदनक्षम जगण्याची सुरुवात होते जी बंधमुक्त असते, मुक्त असते.
मद्रास १९६१, व्याख्यान ८