‘एज्युकेटींग दि एज्युकेटर’, २०१५

एज्युकेटींग दि एज्युकेटर’ (‘सुविद्य शिक्षक घडवताना’) हा परिसंवाद २० मार्च २०१५ रोजी मुंबंईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधे आयोजित करण्यात आला होता.

झपाटाने घडणार्‍या सामाजिक बदलांचा धांडोळा घेता यावा, आणि विशेषत: मुंबंईसारख्या महानगरात उद्भवणारी आव्हाने हाताळण्यासाठी कुठकुठल्या नव्या पद्धती अंगीकारता येतील ह्यावर विचारविनिमय व्हावा म्हणून शिक्षक-अध्यापकांचा ‘अभ्यास घेणारे’ कार्यक्रम आयोजित करण्याची नितांत आवश्यकता आहे. शिक्षक प्रशिक्षण संस्था त्या दृष्टीने कार्यरत असतात, परंतु बहुतेकदा हतबल करणार्‍या व्यवस्थाजन्य अडचणींच्या ओझ्याखाली त्या स्वतःच दबलेल्या असतात. याखेरीज प्रचलित शिक्षणव्यवस्थेबाबत असंतुष्ट असलेल्या मध्यमवर्गाच्या शिक्षणविषयक अपेक्षांना पात्र ठरतील अशा रूढ चौकटीबाहेरच्या, पर्यायी शाळांची गरजदेखील भेडसावते आहे.

‘के.एफ.आय.’ व ‘अध्ययन’ ह्यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला ‘एज्युकेटींग दि एज्युकेटर’ परिसंवाद उपरोक्त प्रश्नांना दिलेली जणू उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. ‘अध्ययन’ ही शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापनाच्या (quality assessment) क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून श्रीम. कविता आनंद तिच्या विद्यमान अध्यक्षा आहेत.

या एकदिवसीय कार्यक्रमाला जवळजवळ पन्नास लोक उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने मुंबंईतील बी.एड. महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षणशास्त्रात रस असलेल्या लोकांचा समावेश होता. हे सत्र घेण्यासाठी श्री. कबीर जयतीर्थ यांना आमंत्रिंत करण्यात आले होते.

प्रास्ताविकात श्री. अभिजीत पडते यांनी परिसंवादाची पार्श्वभूमी व प्रयोजन स्पष्ट केले. तसेच हा कार्यक्रम  उपदेशात्मक/मार्गदर्शनात्मक नसून चिंतनात्मक आहे, तेव्हा सहभागीजनांनी स्वतःला केवळ एक श्रोते समजू नये हा मुद्दा अधोरेखित केला.

श्री. कबीर जयतीर्थांनी ‘ग्रहणरत मना’बद्दल (लर्निंग माइडं) बोलताना ग्रहणक्षम मनाची अवस्था उलगडून सांगितली. जे. कृष्णमूर्ती व त्यांच्या शिक्षणविषयक चिंतनाशी दीर्घ परिचय असलेल्या कबीर यांनी ‘ग्रहण करण्याची प्रवृत्ती’ (लर्निंग) आपण ज्याला ‘शिक्षण / अध्ययन’ म्हणतो त्याहून कशी सर्वांगाने भिन्न असते याबद्दल आपले मत सांगोपांग व्यक्त केले. अध्यापकाचे मन निरामय, अच्छिन्न असणे किती महत्वाचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय त्यांनी स्वतः उघडलेल्या शाळांबद्दल माहिती दिली. नंतर त्यांनी सहभागींशी चर्चा केली.

श्रीम. कविता आनंद ह्यांनी ‘अध्ययन’च्या कामाबद्दल माहिती दिली.

परिसंवाद घडवून आणण्यात अनेक लोकांचे सहकार्य लाभले. निवडक उल्लेख करायचा झाल्यास फादर लॅन्सी प्रभू यांनी परिसंवादासाठी सेमिनार हॉल व तेथील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

शिक्षणप्रक्रियेशी संबंधित विविध समस्यांवर मुक्त, सखोल विचारमंथंन होण्याच्या उद्देशाने योजलेला हा उपक्रम इथून पुढे नियमितपणे सुरु ठेवता येईल अशी आशा आहे.

——————–