कृष्णमूर्ती फाउडेंशन इडिंया, मुंबंई केंद्र ह्या संस्थेच्या विद्यमाने, बॉम्बे केंब्रिज स्कूलतर्फे आयोजित ७, ८ व ९ जुलै २०१७ या तीन दिवसांदरम्यान अधेंरी येथे माध्यमिक शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विषय होता ‘शिक्षक असणे म्हणजे काय?’ आणि निमित्त होते ते या शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधून जवळ जवळ ११० शिक्षक या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी चेन्नईहून ‘द स्कूल’ या कृष्णमूर्ती फाउडेंशनच्या शाळेतून शाळेच्या प्राचार्या श्रीम. जयश्री नंबियार तसेच श्रीम. बीना शिवराम व श्री. अरर्विद रंगनाथन हे शिक्षक आले होते.
सुरुवातीला आपल्या स्वागतपर भाषणात बॉम्बे केंब्रिज स्कूल या संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रम पटेल यांनी या कार्यशाळेचा उद्देश आणि रूपरेषा समजावून सांगितली. या कार्यशाळेचे प्रयोजन सविस्तरपणे सांगताना ते म्हणाले की आज भारतात व इतर देशात असलेल्या कृष्णमूर्तींच्या शाळांचे वैशिष्ट काय आहे याचे इतर शाळेतील शिक्षकांना मोठे कुतुहल असते. कृष्णमूर्तींच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनातून चालणार्या या शाळांमधून कशा प्रकारचे शिक्षण दिले जाते, शिक्षक व विद्यार्थी-पालक यांच्यामधील नातेसंबंध कसे असतात व शिकविण्याच्या पद्धती कशा वेगवेगळ्या असतात याचे मार्गदर्शन सर्व शाळांमधील शिक्षकांना व्हावे असा या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागील प्रधान हेतू आहे. या कार्यशाळेमधून कृष्णमूर्तींच्या शाळांतील शिक्षणपद्धतीविषयी सविस्तर चर्चा, प्रश्नोत्तरे व परिसंवाद घडून यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रथम श्रीम. जयश्री यांनी या कार्यशाळेची सुरुवात करताना आज आपण आव्हानात्मक परंतु अर्थपूर्ण काळामधून जात आहोत याची आपणा सर्व शिक्षकांना जाणीव आहे असे सांगितले. म्हणून शिक्षकांनी स्वत:कडे तसेच विद्यार्थ्यांच्या परस्परसंबंधांकडे पाहत असताना थोडा अवकाश दिला पाहिजे. आज जगात माहितीतंत्रज्ञानाचा महापूर आला असताना विद्यार्थ्यांना स्वत:कडे पाहण्यासाठी काय करावे लागेल याचे भान आज शिक्षकांना ठेवावे लागेल. कृष्णमूर्ती शाळांचे खरे रहस्य हे आहे की आम्ही मुलांना प्रश्न विचारण्यासाठी सक्षम करीत असतो आणि एकमेकांबरोबर सहकार्याने वागण्यास पूरक अशा वातावरणात त्यांच्याबरोबर संवाद साधत असतो. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील नाते मित्रत्वाचे असते व त्यांना शिक्षकाची भीती वाटणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थी आपले मन शिक्षकाकडे मोकळे करू शकतात. श्री. अरविंद हाच विषय पुढे नेताना म्हणाले की, शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील समान धागे कुठचे असतात ते शिक्षकांनी शोधून काढले पाहिजेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आजच्या मानसिकतेवर बोलताना सांगितले की, आज यश मिळविण्याच्या मागे विद्यार्थी व पालक सर्व शक्ती पणाला लावीत असतात. त्यापेक्षा विद्यार्थ्याला काय आवडते, त्याचा कल कुठे आहे, त्याची नैसर्गिक ओढ कुठे आहे याचे निरीक्षण करून शिक्षकांनी त्याला मार्गदर्शन केले पाहिजे. ‘एक शिक्षक म्हणून मी कुठच्या बाबी गृहित धरतो आणि त्याचा माझ्या शिक्षक असण्यावर काय परिणाम होतो’, ते मी पाहिले पाहिजे.
श्रीम. बीना यांनी या विषयावर बोलताना सांगितले की शिक्षकांनी हा व्यवसाय मनापासून निवडलेला असला पाहिजे. तरच त्यांना यामध्ये रस घेऊन शिकवताना निरनिराळे प्रयोग करीत शिकविता ङ्मेईल. विद्यार्थ्यांमध्ये बदल होण्यासाठी प्रयोग करताना स्वत:मध्येसुद्धा बदल करण्यासाठी तयार असले पाहिजे, आपल्या अतंर्मनाशीही संवाद साधला पाहिजे.
श्रीम. जयश्री पुढे असे म्हणाल्या की, आजचे शिक्षण हे विद्यार्थी, शिक्षक, पालक, महाविद्यालङ्मे, शाळा, तसेच समाजापुढे फार मोठे आव्हान उभे करत आहे आणि आपण त्याला कसे सामोरे जाणार आहोत हा मोठा प्रश्न आहे. विद्यार्थी केवळ करिअरच्या मागे न लागता तो एक चांगला माणूस कशा प्रकारे तयार होईल हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
त्यानंतर या विषयावर उपस्थित शिक्षकांबरोबर काही अर्थपूर्ण प्रश्नोत्तरे झाली. सहभागी शिक्षकांनी आपल्या शाळांमधून शिक्षणातील वेगवेगळ्या बाबी कशा हाताळल्या जातात यावर चर्चा केली. त्यानंतर ‘योग्य शिक्षण म्हणजे काय?’ या विषयावरील कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला.
दुसर्या दिवसाच्या सुरुवातीला कृष्णमूर्तींची जीवनदृष्टी शिक्षणात कशी अंमलात आणता येईल यासाठी होत असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिक्षणाच्या विविध अगांचा खोलवर विचार केला गेला.
शिक्षण आपल्यापुढे वेगवेगळी आव्हाने उभी करते. शाळांमधून सामुदायिक स्तरावर कित्येक वर्षांचा अनुभव असतो. आव्हानांवर तात्काळ तोडगा न काढता, आणि आव्हान ही स्वत:च एक समस्या न बनवता, त्याकडे कसे पाहता येईल? शिक्षकांशी संवाद साधून त्यांना त्यांच्यासमोरील आव्हानांना सृजनात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाण्यास, आव्हानांचा खोलवर ठाव घेण्यास उद्युक्त केले पाहिजे, असे श्रीम. नंबियार म्हणाल्या. निरीक्षण करणे, संवाद साधणे, मुक्तपणे विचारणा करणे हा शिक्षणाचा गाभा आहे. या महत्त्वाच्या मुद्याकडे त्यांनी शिक्षकांचे लक्ष वेधले.
त्यानंतर काही विशेष माहितीपटांमधील आणि टीव्हीवरील बातम्यांमधील थोडे भाग दाखविण्ङ्मात आले. त्यात आपल्या आजूबाजूला चालणारा हिंसाचार, स्त्रियांवरील अत्याचार, स्थलांतरितांच्या समस्या, अतिशय दारिद्र्यात दिवस काढणार्या कामगारांची पिळवणूक, तशाही अवस्थेत परिस्थितीवर मात करत आपल्या मुलांच्या भावी शिक्षणाबद्दलच्या त्यांच्या तीव्र आशा, आकांक्षा अशा विषयांवरील चित्रणे होती. श्री. अरर्विद यांनी असे विषय शाळेत हाताळले जावेत का, अशी दृष्ये मुलांना दाखवावीत का, त्यांच्याबरोबर या बाबींवर चर्चा करून त्यांच्यामधील संवेदनशीलता कशी जागृत करता येईल, मुलांच्या प्रतिक्रिया, त्यांचे प्रतिसाद किती उत्स्फूर्त आणि उत्कट असतात इ. वर चर्चा केली.
शिक्षकांनी आपले स्वत:चे मत प्रदर्शित न करता केवळ वास्तव मुद्दे मुलांसमोर ठेवणे, त्याविषयी त्यांच्याबरोबर एकत्रितपणे अधिक माहिती गोळा करणे, एकंदरच प्रतिसादाची गती मंदावणे आणि अधिक खोलवर जाऊन त्या घटनांमगील कारणांचा ठाव घेणे याबद्दल बोलत असताना श्रीम. जयश्री यांनी प्रश्न उभा केला की, एखादी घोर समस्या उभी राहण्याची वाट पाहून मग ती सोडवण्याबद्दल चर्चा करावी का, की एकूणच अशा विषयांबद्दल मुलांच्या जाणीवा सचेतन असाव्यात यासाठी आपण प्रयत्नरत राहावे?
काही लढाईवजा व्हिडिओ गेम्स् आणि प्रत्यक्ष युद्धाची चित्रणे दाखवून व्हिडिओ गेम्स्बद्दल चर्चा झाली. अशा काही खेळांमधून मुलांमध्ये धोरणे आखण्याचे कसब विकसित होते असा युक्तिवाद केला जातो. परंतु अशा खेळांमुळे मुलांना हाणामारी, हत्या, विध्वंस, विभाजन अशा विषयांपासून मनोरंजन मिळू लागते आणि मुलांच्या जाणीवा बोथट होऊ लागतात. परिणामत: मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग पुढील आयुष्यात हिंसेला पूरक अशा कृतींमध्ये केला जाण्याची शक्यता असते. मुलांच्या बालमनात अनेक गोष्टींचा उहापोह होत असतो. त्यांच्याशी आपण संवाद साधून ते सारे मनोव्यापार त्यांना दिसू लागल्यास त्यांच्या कल्पनांचे ठाम मतांमध्ये परिवर्तन होणार नाही, ह्याकडे श्रीम. जयश्री यांनी शिक्षकांचे लक्ष वेधले.
शाळेत चालणार्या काही अभ्यासेतर उपक्रमांविषयी चर्चा करताना काही छायाचित्रे दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांनी जेव्हा शहरातील झोपडपट्टीवजा वस्तीला भेट दिली तेव्हा त्या घरांमधील स्वच्छता बघून ते आश्चर्यचकित झाले. तसेच तेथील बराच कचरा हा खरे तर उच्चभ्रू समाजाच्या उपयोगात येणार्या वस्तूंच्या वेष्टनांचा होता असे त्यांना दिसून आले.
छोट्या-मोठ्या सहलींमधून बांधकाम चालू असलेल्या ठिकाणच्या कामगारांचे जीवन, ग्रामीण भागांचा, शेती, बागायतींचा अभ्यास, गावकर्यांजवळ असेल ते अन्न आलेल्या विद्यार्थ्य़ांबरोबर वाटून घेण्याची त्यांची प्रवृत्ती असे अनेकविध अनुभव मुलांची जीवनविषयक दृष्टी विस्तृत करतात. सहलीला जाताना रेल्वेच्या साध्या वर्गातील प्रवास, शाळांमधून राहणे, इ. मुळे मुलांना जीवनाचे वेगळे अगं अनुभवण्याची संधी मिळते, जी त्यांच्या सुखवस्तू पालकांबरोबरच्या सफरीत त्यांना मिळत नाही.
या शाळेत अनेक इयत्तांमधील मुलांचे गट एकत्र बसून (Vertical Groups) बर्याच विषयांचे वर्ग चालविले जातात. ह्याविषयीची छायाचित्रे दाखविण्यात आली. कार्यशाळेत सहभागी शिक्षकांना याबद्दल अतिशय कुतुहल वाटले आणि यावर सविस्तर चर्चा झाली. श्रीम. बीना यांनी सांगितले की, अशा वर्गांमध्ये सहयोगी शिक्षणाची भावना असते. वरच्या वर्गातील मुलांना लहान मुलांबद्दल जबाबदारीची भावना असते, छोट्या वर्गातील मुले मोठ्या मुलांकडूनही विषय शिकत असतात. इथे शिक्षकाला प्रत्येक मुलाशी संवाद साधणे जरूरीचे असते. काही विषयांची प्रस्तावना एकत्रितपणे करून नंतर ते वेगवेगळ्या गटांसाठी हाताळावे लागतात. ह्या पद्धतीमध्ये मुलांमध्ये स्पर्धा आणि तुलना या भावना पोसल्या जाण्यास वाव नसतो. सतत ठराविक मापनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन न केले गेल्यामुळे मुलांमध्ये भीतीची भावना असत नाही.
वेगवेगळ्या कला, साहसी उपक्रम, खेळ यामधून मुलांना एकत्र येऊन आव्हाने स्वीकारण्याचे शिक्षण मिळते. या शाळा आतंरशालेय स्पर्धात्मक खेळांमध्ये भाग घेत नसल्याने इतर शाळांमधील मुलांबरोबर संवाद साधण्याच्या उद्देशाने वार्षिक नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाते. इतर शाळांमधून या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रचंड मागणी असते. विद्यार्थ्यांनी स्वत: अनुभवलेल्या प्रसंगांवर आधारित आणि सामाजिक जाणिवांना चेतना देणारी काही नाटकेही मुले बसवितात.
एकंदरीत सर्व जीवसृष्टीबद्दल आदराची भावना जोपासली जाणे, त्यातील सौंदर्य, नि:स्तब्धता अनुभवणे, आपल्या ‘स्व’ पलिकडे जाऊन विचार करणे, प्रश्न उभे करणे या सार्यातून मिळणार्या शिक्षणाची एक आगळीच गुणवत्ता असते. तेथे तयार उत्तरे नसतात तर सततचा शोध असतो.
दुपारच्या सत्रामध्ये तीन वेगवेगळ्या गटांमधून झालेल्या गटचर्चांमध्ये शिकणे, भीती, राग, परस्परसंबंध, एखाद्या विषयाचा उत्कटतेने अभ्यास करणे, शांतपणे इतरांचे बोलणे ऐकूण घेण्याची कला, इ. विषयांवर विस्तृतपणे विचारांची देवाणघेवाण झाली.
कार्यक्रमाची सांगता करताना ‘आपण शिक्षक का आहोत’ याबद्दल आत्मनिरीक्षण करण्याने इतर अनेक बाबी क्षुल्लक वाटू लागतात असे. श्रीम. जयश्री नंबियार यांनी सांगितले. शिक्षणाकडे बघण्याचा एक आगळावेगळा दृष्टीकोन आपल्याला गवसला आहे, असे मत सहभागी शिक्षकांनी प्रदर्शित केले. बॉम्बे केंब्रिज गुरूकुल शाळा समुहाच्या विकास विभाग प्रमुख श्रीम. सविता वेंकट यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि या कार्यशाळेतून शिक्षकांना एक वेगळी अतं:प्रेरणा मिळाली असावी अशी आशा प्रकट केली.
९ जुलै रोजी खास बॉम्बे केंब्रिज गुरूकुल समुहांच्या शाळांमधील शिक्षकांसाठी एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणक्षेत्रात अनेक वर्षे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव असणार्या आणि कृष्णमूर्तींच्या जीवनदृष्टीच्या अभ्यासक श्रीम. वासंती पडते यांनी गोव्यामध्ये एक शाळा स्थापन करताना त्यांनी कशा प्रकारे अनेक महत्त्वाच्या बाबी हाताळल्या त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते येथे त्यांच्या शब्दांत संक्षिप्तपणे मांडले आहे:
‘कृष्णमूर्ती शाळांना भेटी दिल्यानंतर व त्या विचारांचे मानवतेसाठी असलेले महत्त्व पटल्यावर सर्वसाधारण शाळांतील मुले ह्याला वंचित राहतात याची तीव्र जाणीव झाली. कृष्णमूर्ती शाळांमधून लक्षात आले की मुले निर्भीड वातावरणात नीट शिकू शकतात, बालपणाच्या निरागसतेत आनंदाने वाढू शकतात.
अशीच एक संधी आली आणि आव्हानही. एका इग्रंजी प्रायमरी शाळेतून सल्लागार म्हणून आमंत्रण आले. शाळा म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासक, शाळेचे इतर कर्मचारी, तसेच अभ्यासक्रम वगैरे. अर्थात शाळेची इमारत आणि परिसर हे देखील आलेच. या सर्व बाबींना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देणे हा या कामाचा भाग होता.
१. शाळेच्या प्रशासकांकडून पूर्ण विश्वासाने संपूर्ण स्वातंत्र दिले गेले आणि त्यांच्या उद्दिष्टांना पोषक असलेले नियम पाळूनच दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग केला गेला.
२. पालक हे एक कठीण आव्हान होते. पण मुलांचे भले व त्यांचे चांगले भवितव्य यावर त्यांचे एकमत होते. ‘चांगल्या’च्या बदलत्या व्याख्येवर भर देऊन पालकांकडून या उपक्रमाला पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न होता. मुलांच्या प्रगतीची संपूर्ण जबाबदारी शाळेची राहील या गोष्टीचा त्यांना दिलासा होता. गृहपाठ बंद केला होता. मुलांवरचा ताण कमी करण्याच्या प्रयत्नात पालकांवरचा ताणपण कमी झाला. मुलांच्या भावनिक वाढीत त्यांच्या सहकाराची अपेक्षा असते यावर पालक आणि शिक्षक यांच्याबरोबरील (पीटीए) मीटींगमध्ये चर्चा केल्या जातात.
३. शिक्षकांना जरूरीप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते. शैक्षणिक विषयांबरोबर सामाजिक, वैज्ञानिक, राजकीय प्रश्नांवर चर्चा, चांगल्या पुस्तकांचे सामुहिक वाचन, इतर वेगळ्या प्रकारे चालणार्या शाळांना भेटी व त्यांचा अभ्यास ह्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न असतो. भयमुक्त वातावरणात शिकवणे म्हणजे तुलना, परिक्षा, स्पर्धा बंद केल्या जातात. त्यामुळे परिक्षेशिवाय प्रगतीचे मूल्यमापन हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. असा हा मोठा आवाका असलेला कार्यक्रम अनेक बारकाव्यांसह योजावा लागतो. तो राबवण्यासाठी शिक्षकांची मानसिकता बदलावी लागते. ह्या कार्यक्रमामागचे तत्त्वज्ञान व महत्त्व त्यांना समजणे आवश्यक आहे. ते त्यांना आत्मसात करावे लागते. हा प्रयोग शिक्षकांचा व्हावा लागतो, त्यांच्यावर लादलेला नव्हे. येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचा वापर नसतो. शिक्षकांना त्यात एक नितांत आनंद मिळेल अशी मानसिकता निर्माण होईल ही जबाबदारी आपली असते.
विद्यार्थ्याने मनात भीती न बाळगता शिकणे हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यासाठी प्रामुख्याने तुलना, स्पर्धा संपूर्णपणे टाळल्या जातात. तरीही मुलं शिकली पाहिजेत, प्रगती झाली पाहिजे ही अपेक्षा असते. ही कसरत यशस्वीरित्या पार पाडता येते, असे दिसून येते. उलट अनुभव असा आहे की भय व ताण नसल्यामुळे मुले मुक्त वातावरणात आनंदाने त्यांच्या संपूर्ण क्षमतेप्रमाणे प्रगती करू शकतात. लहान मुलांना महत्त्वाकांक्षा नसते, पालकांना असते. पालकांशी संवाद साधणे व मुलांचे हित जपणे महत्त्वाचे आहे.
अभ्यासक्रमात बरेच बदल करणे भाग असते जेणेकरून शिक्षकांना हा कार्यक्रम सक्षमतेने हाताळता येतो. शाळेच्या इतर कर्मचार्यांना पण ह्या बदलाची जाणीव करून देऊन त्यांच्याशी जवळीक साधली जाते.
शिक्षक, पालक, विद्यार्थी बदलत असतात. ह्या शाळेत गेली वीस-बावीस वर्षे हा प्रयोग चालू आहे. ह्यातून काय निष्पन्न होते याचे मोजमाप नाही, त्याबद्दल अपेक्षा नाही. हा प्रवास आहे, ज्यात उत्कटता आहे, कळकळ आहे आणि हा प्रवास मानवासाठी योग्य दिशेने जात आहे.
श्रीम. वासंती पडतेंशी असा संवाद साधल्याने ही शिक्षणदृष्टी कृष्णमूर्ती शाळांबाहेरही अंमलात आणता येते याबद्दलचा शिक्षकांचा विश्वास अधिकच बळावला. त्यानंतर आदल्या दिवसाच्या कार्यशाळेप्रमाणे माहितीपट आणि बातम्यांवरील चित्रणांवर तसेच शाळेतील उपक्रमांवर चर्चा झाली, गटचर्चा झाल्या आणि कृष्णमूर्तींच्या भाषणांचे काही व्हिडिओ दाखविण्यात आले.
बॉम्बे केंब्रिज गुरूकुल समुहात कृष्णमूर्तिंच्या शिक्षणदृष्टीच्या अनुषंगाने बरेच उपक्रम केले जात असल्याने तेथील शिक्षकांना ह्या कार्यशाळेमुळे अशा कार्यामागील गहन विचार आणि त्यातील तरल जाणीवा यांचे आकलन झाले असावे, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
_______________





