जे. कृष्णमूर्तींच्या भाषणांमधून चराचर सृष्टीवरचं त्यांचं अपार प्रेम जाणवतं. या प्रेमापोटीच ते सातत्याने निसर्गाशी, माणसांशी संवाद साधत राहिले. जीवनभर अविरत सुरु असलेल्या त्यांच्या या संवाद-यात्रेत, मुंबई शहराला खूप महत्वाचं स्थान आहे. साधारणपणे १९२४ ते १९८५ या कालावधीत कृष्णमूर्तींनी अनेक वेळा मुंबईकरांशी संवाद साधला. १९४८ नंतरच्या काळात, दर हिवाळ्यामध्ये मुंबईच्या सर जे. जे. कलामहाविद्यालयाच्या वृक्षराजीने नटलेल्या प्रसन्न प्रांगणात कृष्णमूर्तींची व्याख्यानं होत असत. त्यांच्या मुक्त चिंतनाचा लाभ घेण्यासाठी तेव्हा विद्यार्थी, गृहिणी, विचारवंत, राजकारणी, व्यापारी, कलावंत, संन्यासी अशी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातली, विविध वयोगटातली आणि विभिन्न धर्मपंथांची शेकडो माणसं येत असत.




