नवीन प्रकाशन: कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांना लिहिलेली पत्रे – जीवनाची निरंतर वाटचाल हेच शिकणे

LTS Marathi for Ticker

जे. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या शाळांना लिहिलेल्या इंग्रजी पत्रांच्या संकलनाचा हा मराठी अनुवाद पद्मगंधा प्रकाशनाने अलिकडेच प्रकाशित केला आहे. जे.कृष्णमूर्तींनी त्यांच्या शाळांतील शिक्षकांना-पालकांना  तळमळीने व जिव्हाळ्याने लिहिलेली ७२ पत्रे या पुस्तकात समाविष्ट केली आहेत. श्रीमती वासंती पडते यांनी हा सुबोध सुंदर अनुवाद केला आहे.

या पत्रांमधून कृष्णमूर्तींची शिकवण, त्यांचा शिक्षण विषयक दृष्टीकोन, अशा प्रकारच्या जीवनदृष्टीसाठी आवश्यक असलेले अवधान, आत्मभान, स्वत:चे निरीक्षण करण्याची तयारी, निसर्गाशी तसेच स्वत:बरोबर व इतरांशी असलेले नातेसंबंध याचे मार्मिक विवेचन त्यांनी केले आहे.

संस्कृती, परंपरा म्हणजे काय, राष्ट्रवाद, धर्म, संस्कारबध्दता, स्वातंत्र्य, व्यवस्था-अव्यवस्था, शिक्षकांची पालकांची जबाबदारी, परस्परसंबंध आणि नैतिकता या अत्यंत ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी गंभीरपणे या पत्रांमधून भाष्य केले आहे. या सर्व संकल्पना, ज्या त्यांच्या शिकवणुकीचा गाभा आहे, त्या शिक्षकांना–पालकांना कशा समजावून देता येईल याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

मुलांना भीतीमुक्त वातावरणात त्यांच्यातील सुप्त क्षमतांना, कलागुणांना प्रोत्साहन देत त्यांच्यातील चांगुलपणा कसा फुलविता येईल, त्यांच्यामध्ये संवेदनशीलता, प्रज्ञा कशी जागृत करता येईल आणि हे सर्व शिक्षकांनी स्वत: समजून घेत असताना त्यांना मुलांशी त्याबद्दल संवाद कसा साधता येईल हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या  पत्रांमधून केला आहे.

हे पुस्तक मराठी माध्यमाच्या शाळांतील ज्या शिक्षकांना अशा प्रकारच्या शिक्षणामध्ये रस असेल त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन । भाषांतर : वासंती पडते । किंमत: रु. ३००/-