कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया – मराठी संमेलन २०१६

जे. कृष्णमूर्ती नेहमी म्हणत की आपली शिक्षण व्यवस्था ही अत्यंत दयनीय, वाईट अवस्थेत असलेल्या समाजाशी जुळवून घेणारी आहे. आतंकवादाच्या, आर्थिक महासत्तांच्या प्रचंड हावेमुळे होणार्‍या पिळवणूकीच्या, राष्ट्रवादाच्या गर्तेत सापडून स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या सरकारांचं दबावतंत्र आणि लोकशाहीला ताब्यात घेणार्‍या व्यावसायिक महासत्ता (Corporations) यांच्या विळख्यात सगळं जग सापडलं असतांना, कृष्णमूर्ती मात्र खूप क्रांतिकारी आणि मूलगामी असे विचार मांडत होते.

मात्र गेल्या ७५ वर्षात झालेला ‍र्‍हास आपण बघत आहोत. त्या र्‍हासाला केवळ ज्ञान आणि क्षमता विकास करणार्‍या शिक्षणाने भरच घातली आहे, हे ही आपण बघतच आहोत. त्यामुळेच आता शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची नितांत गरज आहे.

शिक्षणाची गुणवत्ता हा असमाधानाचा विषय आहे, शाळा आहेत पण शिक्षण नाही अशी सुरुवात करत श्री. हेरंब कुलकर्णी म्हणाले की शिक्षण हा अर्थकारण, राज्यकारण आणि धर्माकारणाचा आरसा आहे. शिक्षण-व्यवस्था हे साधन आहे. अर्थव्यवस्थेला जशा प्रकारची माणसं लागतात तशा प्रकारची व्यवस्था शाळांतून केली जाते, हे त्यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या संगणकांच्या संख्येवरून दर्शवून दिले.

‘विचार कसा करावा’ हे शिकवणारं शिक्षण हवं, मात्र आजचं शिक्षण हे ‘विचार न करू देणारं’ आहे असंही ते म्हणाले. विशिष्ट विषयात नैपुण्य मिळवून देणारं हे आजचं शिक्षण सर्वांगीण विकास घडवण्यास मात्र सक्षम नाही, असंही त्यांनी सांगितलं. पालकांनाही दुर्दैवाने मुलांना फक्त उत्तम व्यवसाय देणारं शिक्षण हवं आहे, असं ते खेदाने म्हणाले.

आजची अर्थव्यवस्था ही जास्तीत जास्त उपभोग घ्यायला उद्युक्त करणारी आणि त्यायोगे फक्त GDP (सकल घरगुती उत्पादकता) वाढवणारी आहे.

या सगळ्या भयावह पार्श्वभूमीवर, कृष्णमूर्तींचे शिक्षण विषयक विचार त्यांनी मांडले. ते म्हणाले की कृष्णमूर्ती आपल्याला विचार करायला भाग पाडतात, प्रचंड संवेदनाशील बनवतात. कृष्णमूर्तींच्या शाळांतील मुलं आणि शिक्षकांचे खेळीमेळीचं, स्वामित्वाची भावना नसलेलं, समानतेचं, निसर्गाच्या सहवासात शिकण्याचं आणि शिकवण्याचं हृद्य नातं ही सगळ्यात मोलाची गोष्ट आहे, हे त्यांनी उदाहरण देऊन दाखवून दिलं.

२०१० सालच्या ’शिक्षणाचा मूलभूत हक्क – Right to Education’ या कायद्या अंतर्गत, मुलांच्या शिक्षेवर बंदी आणि आठवी पर्यंत परीक्षा न घेण्याचे शासनाचे निर्णय हा कृष्णमूर्तींच्या विचारांचा विजय आहे, असंही ते म्हणाले.

शिक्षकांचं व्यक्तिमत्व हे अहिंसक, पारदर्शक आणि प्रेमळ असलं पाहिजे आणि ते कृष्णमूर्तींच्या शाळेत त्यांनी पहिलं आहे. कृष्णमूर्तींचे विचार, तत्वज्ञान हे शाळेत वाचले जात नाहीत तर ते प्रत्यक्षात उतरवले आहेत.

बहुतांश शिक्षक कामं करत नाहीत हे खरं असलं तरी त्यांना मार्गदर्शन नाही, हेही तितकेच खरं आहे असं ते म्हणाले. त्यासाठी शिक्षकांना कृष्णमूर्तींचे विचार आणि शाळांतील अनेक उपक्रमांची माहिती त्यांना द्यावी. त्यामुळे अनेक चांगले बदल घडून येतील.

मुलांमधे प्रेम, उत्कटता, संवेदनशीलता, विचार करण्याची क्षमता यायला हवी असेल तर पालकांशीही संवाद साधणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

आजच्या पालकांची मानसिकता फार भयानक आहे. अनेक पालकांना मुलांचं मुक्त असणं, त्यांना निवांतपण, मोकळा वेळ  देणं हे मान्यच नाही. त्या पालकांना  सचिन तेंडुलकर पासून अनेक महापुरुष आपल्या पाल्यात असावे असं वाटत असल्याने तेच मुलांच्या हत्या करतात आहेत, असंही त्यांनी खूप खेदाने सांगितले. म्हणूनच शिक्षणावर काम करत असतांना पालकांशी संवाद साधणं खूपच आवश्यक आहे असं ते म्हणाले.

शिक्षण व्यवस्था ही क्रांतीसारखी एकदम बदलत नाही, ती हळूहळू बदलणारी प्रक्रिया आहे.  त्यामुळे त्यात हस्तक्षेप करून, कृष्णमूर्तींचे शिक्षण विचार शासन, शिक्षक, पालक यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत की जेणेकरून शिक्षणात आणि त्याद्वारे समाजात आमुलाग्र बदल घडून येईल.

युद्धविरोधी, धर्मनिरपेक्ष, ’विचार करायला शिकवणारं’, संवेदनक्षम मन तयार करण्यासाठी आणि जबाबदार व्यक्तिमत्व तयार करणारं शिक्षण संवादातून करणं सहज शक्य आहे असंही श्री. हेरंब कुलकर्णी  म्हणाले.

१४ वर्षे कृष्णमुर्तींच्या सहवासात राहिलेले ८८ वर्षांचे डॉक्टर परचुरे हे या संमेलनातील सगळ्यात तरुण, हसरं, उत्कट आणि उस्फुर्त व्यक्तिमत्व होतं.

कृष्णमूर्तींची शिकवण आत्मसात करणं याचा अर्थ त्यांच्या दृष्टीने काय आहे याविषयी ते बोलले. शून्यता आणि एकात्मता हा कृष्णमूर्तींच्या शिकवणूकीचा गाभा आहे असं त्यांना वाटतं.

कृष्णमूर्तींची शिकवण आत्मसात करण्यासाठी त्यांनी स्वत:वरच कसे प्रयोग केले हे त्यांनी सांगितलं. हे करण्यासाठी आतंरिक इच्छा आणि उत्कटता या दोहोंची नितांत आवश्यकता आहे असं त्यांना वाटतं. आणि या दोन्ही गोष्टी कायम टिकवायच्या असतील तर आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे असं ते म्हणाले.

जीवन जगताना आणि विचार करताना आपण सतत ’निवड’ करत असतो, प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन करत असतो. आणि हे करत असताना आपल्या मनामध्ये कसलं तरी एक मूल्य (value) असतं, चूक किंवा बरोबर असं. हे मूल्य आपल्या परंपरांमधून, संस्कारातून आलेलं असते. परंतु एखाद्या गोष्टीवर टीका करताना त्याच्या मागे कोणतं मूल्य आहे हे जर आपल्याला शोधून काढता आलं तर ती फार मोठी गोष्ट होईल असं ते म्हणाले. त्यामुळे तुम्ही ’निवड‘ करणं संपवून ’निवड केवळ बघणं किंवा पाहणं या अवस्थेपर्यंत सहज जाऊ शकाल आणि तेव्हा तुम्ही कृष्णमूर्तीं म्हणतात त्या शब्दातीत, कालातीत अवस्थेत गेलेले असाल असंही ते म्हणाले.

डॉक्टर शैलेश शिराळी हे जवळजवळ ४० वर्षे कृष्णमूर्तींच्या शिकवणूकीचे अभ्यासक आहेत आणि अनेक वर्षे त्यांनी कृष्णमूर्तींच्या शाळांमधे काम केलं आहे. त्यांनीही कृष्णमूर्तींचे शिक्षणविषयक विचारच आजच्या जगातील भीषण प्रश्न सोडवण्यास कसे सक्षम आणि गरजेचे आहेत हे अनेक उदाहरणे देऊन समजावून दिलं.

गॅदरिंगच्या दुसर्‍या दिवशी संध्याकाळी शास्त्रीय संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीमती सौम्या उल्लाल-कंटक यांच्या दोन तासाच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. सह्याद्री स्कूलच्या प्रशांत वातावरणात शास्त्रीय संगीत ऐकणं हा एक आगळा अनुभव होता.

या दोन दिवसात कृष्णमूर्तींच्या भाषणांचे आणि संवादांचे व्हिडिओ दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे The Challenge of Change या कृष्णमूर्तींवर बनवलेल्या चित्रपटाचा मराठी रूपांतरणातील काही भाग दाखवण्यात आला. कृष्णमूर्तींच्या शिकवणूकीचे, तत्वज्ञानाचे ,विचारांचे सखोल आकलन व्हावे या दृष्टीने गटचर्चा व परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले होते.  सध्याच्या गुंतागुंतीच्या, संभ्रमित आणि हिंसेने पछाडलेल्या जगात शिक्षणातून आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विविध मार्ग, विचार आणि उपक्रम शोधणे याविषयी चिंतन केले गेले.